Fri, May 29, 2020 19:03होमपेज › Satara › वृक्षालाच सेलिब्रेटीचा मान देत वृक्षसंवर्धनाची अनोखी चळवळ

वृक्षालाच सेलिब्रेटीचा मान देत वृक्षसंवर्धनाची अनोखी चळवळ

Published On: May 01 2019 8:29AM | Last Updated: May 01 2019 8:29AM
सातारा : विशाल गुजर

सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत असलेले अनेक उपक्रम जगात सर्वत्र साजरे केले जातात. साताराही त्याला अपवाद नव्हता आणि नाही. मात्र, त्यातही आपले वेगळेपण जपत सातारकरांनी एका वृक्षालाच सेलेब्रेटीचा मान देत एक वृक्षप्रेमाची, वृक्षसंवर्धनाची चळवळ सुरु केली. आणि आज ती बघता बघता १८ वर्षे पूर्ण करुन खर्‍या अर्थाने वयात येत आहे. 

ज्येष्ठ चित्रकार पी. बी. तारु आणि युवा चित्रकार सागर गायकवाड यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या सातार्‍याच्या  ‘गुलमोहर डे’ या रंगोत्सवाने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आपली वेगळी  ‘प्रतिमा’ तयार केली आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी  सत्कारणी लावण्यासाठी रेखाटलेली गुलमोहराची काही पेटींग्ज राजपथावरील शाहू बोर्डींगसमोरील फुटपाथवर मांडून सुरु झालेल्या या रंगोत्सवाने आता सातार्‍यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोणालाही कसलेही निमंत्रण न देता ठराविक जणांचा कंपू  एका विशिष्ट जागी जमून 1 मे च्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवत असे.  दुसर्‍या दिवशी त्याआधी जमा झालेल्या पुंजीवरच त्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात येत असे. चाराचे आठ, आठाचे बारा अशी वाढती सभासद संख्या कोणतेही बंधन न ठेवता जमू लागली आणि वर्षानुवर्षे हीच अखंडित परंपरा आजअखेर सुरु आहे. 

विशेष म्हणजे आजअखेर या वृक्षप्रेमी चळवळीला त्या अर्थाने म्होरक्या नाहीच. कुणीही अध्यक्ष नाही, कुणीही उपाध्यक्ष नाही. या चळवळीत येणारा प्रत्येकजणच अध्यक्ष. दोन-चार पेटींग्जच्या प्रदर्शनाने सुरु झालेल्या या उपक्रमाने आता शेकडोच्या घरात पेटींग्ज, अनेकांनी पाठवलेल्या शेकडो छायाचित्रांमधून निवडक छायाचित्रे, शिल्पकलेच्या कलाकृती आणि इतर बर्‍याच उपक्रमांनी  रंगत आणली आहे. पारंगे चौक, राजवाडा त्यानंतर सेंट पॉल स्कूल आवारात असणार्‍या अनेक गुलमोहराच्या वृक्षांमुळे आणि याच रस्त्यावर दुर्तफा असलेल्या गुलमोहराच्या वृक्षांमुळे या रंगोत्सवाला नेहमीच एक झळाळी आली आहे.   प्रारंभीच्या काळात बालकलाकार असलेले अनेकजण आता युवा चित्रकार म्हणून या उपक्रमात आपला समजून  आवर्जून हजेरी लावत आहेत.   याच उपक्रमात निमंत्रितांसह विजेत्यांना  भेट म्हणून दिलेल्या वृक्षांनीही आपली पाठमुळे जमिनीत घट्ट रोवली आहेत. पहिल्यांदा काही तासांचा असलेला हा उपक्रम काही वर्षापूर्वी तीन दिवसांचाही झाला होता. मात्र जागेचा अभाव असल्याने त्यावर मर्यादा आल्या. 

सध्या सेंट पॉल स्कूलच्या आवारात सकाळी 7 ते दुपारी 12  आणि पुन्हा सायंकाळी 4 ते 7 असे आठ तास होणारा हा उपक्रम आता खर्‍या अर्थाने वयात आला आहे. नव्या पिढीकडे याची सूत्र देत असताना वडिलकीच्या भावनेने त्यांच्या आर्थिक पाठबळासाठी  नुकताच कला महोत्सव हा आणखी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत त्यांच्या पाठीशी खर्‍या  अर्थाने उभे राहण्याचा नवा पायंडाही यानित्तिाने  पाडण्यात आला आहे. यंदाही 1 मे दिवशी हा सोहळा होत आहे, यावेळी सोहळ्याला नवतारुण्याचा बहर आणि खर्‍या अर्थाने बळकट बाहूंचा आधार मिळणार आहे.

सौंदर्याची नजाकत

गुलमोहर (शास्त्रीय नाव : डिलॉनिक्स रेजिया) हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असे नाव आहे. हा मूळचा मादागास्कर येथील वृक्ष आहे. गुलमोहर हा वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो. झाडाखाली भगव्या फुलांचा बहर ओसरल्यावर गुलमोहोरावर चपट्या फुट दीड फुट लांब अन दोन ते तीन इंच रुंदीच्या तलवारीसारखा बाक असलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा लटकू लागतात. कालांतराने या शेंगातील बिया जमिनीवर पडून त्यापासून नवीन गुलमोहोराची झाडे अंकुरतात. जगभरात हे झाड निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीत बहरताना दिसते. 

गुलमोहोराचा इतिहास आणि माहिती

गुलमोहोराच झाड सर्व प्रथम मुंबईत शिवडी येथे आढळल्याचा उल्लेख एस.एम.एडवर्डस या शास्त्रज्ञाने  तयार केलेल्या  वनस्पती-सूचित नमूद केला आहे. सामान्यत: गुलमोहोराच सरासरी आयुर्मान 40 ते 50 वर्षे असते. जमिनीकडे झेपावणार्‍या फांद्यांमुळे गुलमोहोराचा छत्रीसारखा घुमट तयार होतो. गुलमोहोर वृक्षाच्या फांद्या तांबूस-तपकिरी असतात तर गुलमोहोराच्या खोडावरील साल असते काळ्या तपकिरी रंगाची. गुलमोहोराच्या फांद्याची वाढ झपाट्याने होत असल्याने या झाडाची वारंवार छाटणी करणे श्रेयस्कर ठरते.  गुलमोहोराचा वृक्ष अत्यंत कमकुवत असतो. जोरदार वार्‍या-वादळात गुलमोहोराची झाडे सहज पडू शकतात. गुलमोहोराची नाजूक लेस सारखी मनमोहक हिरव्या-पोपटी रंगातील पानं संयुक्त प्रकारची असतात. अनेक छोट्या-छोट्या पानांनी बनलेल्या गुलमोहोराच्या संयुक्त पानाची लांबी दोन फुटापर्यंत असू शकते. फेब्रुवारी - मार्चदरम्यान गुलमोहोराची पाने गळायला सुरु होते. गुलमोहोराचे झाड ओकबोक दिसू लागते. गुलमोहोराला पुन्हा पालवी फुटते एप्रिल-मे च्या सुमारास लुसलुशीत कोवळी पान गुलमोहोराच्या सौंदर्यात भर टाकतात. गुलमोहोराच्या वैशिष्टयपूर्ण लाल-केशरी पाकळ्यांवर पांढर्‍या - पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेषा असतात. अन त्यामुळे या फुलाच सौंदर्य अधिकच खुलत. गुलमोहोराला अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील मायामी इथे विशेष स्थान लाभले. दरवर्षी  गुलमोहोर बहरात येण्याच्या काळात इथे वार्षिक ‘गुलमोहोर फेस्टिव्हल’च आयोजन केलं जातं. 

अशा सुंदर गुलमोहोराचा छोटा अवगुण म्हणजे गुलमोहोराची मूळं. गुलमोहोराची मूळं गुलमोहोराच झाड जसं वाढत जात तशी मोठी होत जातात. आधार मुळांसारखी. जमिनीच्या नजीक गुलमोहोराचा बुंधा उंचावतो व पसरट आधार मूळं जमिनीतून डोकं वर काढतात. कधीकधी ही गुलमोहोराची मूळं इमारतींचा भक्कम पाया उखडून टाकू  शकतात.गुलमोहोराच्या जमिनीवर येणार्‍या  मुळांमुळे बगीच्यात बांधलेले रस्ते किंवा दगडी पायवाटा गुलमोहोर पार उखडून टाकू शकतो. पण इतक्या चांगल्या झाडाच्या या छोट्या दोषाकडे थोडा कानाडोळा करून जर गुलमोहोर रस्ते इमारतींपासून थोडा दूर ठेवला तर या वृक्षासारखा सौंदर्यसंपन्न दुसरा वृक्ष नाही. अनेक वसाहतींच्या सभोवार, बागांमधून रंग उधळत गुलमोहोराच्या पिळदार खोडांचे वृक्ष उभे आहेत.