होमपेज › Satara › सातार्‍यातील भुयारी गटर योजनेचा मार्ग मोकळा

सातार्‍यातील भुयारी गटर योजनेचा मार्ग मोकळा

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:48PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा धडाका सुरू ठेवत सातारा विकास आघाडीने  भुयारी गटर योजनेच्या कामास मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. दरम्यान, मंगळवार पेठेतील कात्रेवाडा परिसरातील पाणीटाकीचे उद्घाटन प्रोटोकॉल बाजूला ठेवून केल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी करत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. त्यामुळे   साविआ तसेच नविआ, भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली.  दरम्यान, विषयपत्रिकेवरील विषयांचे टिपण  दिले नसल्याने सांगत नाराज विरोधी  नगरसेवकांनी सभात्याग केला.

सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी सभागृहात  नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी पार पडली. सभा ऐन वेळच्या विषयांनी गाजली. भाजपचे नगरसेवक  विजय काटवटे यांनी मंगळवार पेठेतील कात्रेवाडा पाणीटाकी शुभारंभ तेथील नगरसेवकांना डावलून केला. कामाशी संबंध नसणार्‍या कार्यकर्त्याने स्वत:ची लग्‍नपत्रिका असल्यासारख्या कार्यक्रमपत्रिका वाटल्या.  प्रोटोकॉल का पाळला नाही, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी केली. कोनशिलेवर आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव का टाकले नाही, अशी विचारणा नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी केली.

यावर पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर  माहिती देत असताना  खा. उदयनराजे यांच्या नावाखाली चुकीची कामे केली जात असल्याचा आरोप नगरसेविका सिध्दी पवार यांनी केला. त्यामुळे साविआ नगरसेवक जबरदस्त आक्रमक झाले. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, स्मिता घोडके, यशोधन नारकर यांनी विरोधकांना जशास तसे उत्‍तर दिले. काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विरोधकांना नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनीही चोख उत्‍तरे दिली आणि शांततेचे आवाहन केले. मुख्याधिकारी शंकर गोरे  म्हणाले, संबंधित कार्यक्रम जीवन प्राधिकरणाने घेतला होता. या कार्यक्रमाची पत्रिका तयार केल्याची कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खा. उदयनराजे यांच्याबद्दल आदर पण त्यांच्या नावाखाली चुकीची कामे करु नका, असा खुलासा पवार, काटवटे यांनी केला. त्याचवेळी वसुली विभागावरही नगरसेवकांनी ताशेरे ओढले. कुठल्या भागातील किती वसुली झाली याची माहिती देवून पहिल्या शंभर थकबाकीदारांची माहिती द्यावी, अशी मागणी यावेळी नगरसेवक वसंत लेवे, विशाल जाधव, अशोक मोने यांनी केली. वसुलीची माहिती तयार आहे. मात्र, संबंधित अधिकारी रजेवर असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. त्यावेळी संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अशोक मोने यांनी नगराध्यक्षांवर नाकर्तेपणाची टीका केली. त्या टीकेचा समाचार घेताना अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले,  नगराध्यक्षा त्या पदासाठी योग्यच आहेत. संबंधित अधिकारी रजेवर असल्याने माहिती देण्यास विलंब होतोय याचा अर्थ कुणीच पदास लायक नाही, असा होत नाही, अशा शब्दांत बजावले आणि वादावर पडदा पडला. 

अपेक्षित फार काही करता न आल्याने वसंत लेवेंचा यावेळी चांगलाच हिरमोड झाला. आयत्या वेळच्या विषयांवर घमासान सुरु असतानाच विषयपत्रिकेवरील विषय वाचनास सुरुवात झाली. त्यावेळी विरोधकांनी सभेसमोर उपसूचना मांडली. त्या उपसूचनेचे वाचन झाले.  संबंधित विषयांच्या टिपण्या उपलब्ध  न केल्यामुळे सभा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.  

विरोधकांनी सभागृहातून ‘वॉकाऊट’ केल्यानंतर अ‍ॅड. बनकर यांनी सर्व विषय मंजूर करुया, असे सूचित केले. विरोधकांना सभागृहात बसायचे नसेल तर त्यांचे विषय तरी कशाला मंजूर करायचे, असे लेवे यांनी सांगितले. त्यानंतर प्रभाग क्र. 16 मधील मालशे पूल रुंदीकरण, प्रभाग क्र. 19 मधील रामाचा गोट येथील बहुद्देशीय हॉल व्यायाम शाळा बांधणे तसेच त्याच प्रभागातील रस्ता रुंदीकरणाचा विषय तहकूब ठेवण्यात आला. उरलेल्या 22 विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये सातार्‍यात राबवण्यात येत असलेल्या भुयारी गटर योजनेची निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. शिवाय सोनगाव कचरा डेपोतील घनकचरा प्रकल्पाशी संबंधित विविध कामांनाही मंजुरी मिळाली. सातारा पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या जागेच्या आरक्षणासंदर्भातही निर्णय घेण्यात आला.कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. विरोध होवूनही साविआने विकासकामांचा धडाका सुरुच ठेवला. तीन विषय वगळता 22 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. दरम्यान, विरोधकांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बोंबाबोंब आंदोलन केले. 

 

Tags : satara, satara news, Satara Municipality, Underground Gutte Scheme,