होमपेज › Satara › भुयारी गटर योजनेसह विकासकामांचा आज शुभारंभ : खा. उदयनराजेंची वचनपूर्ती

भुयारी गटर योजनेसह विकासकामांचा आज शुभारंभ : खा. उदयनराजेंची वचनपूर्ती

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:48PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात  येणार्‍या  भुयारी  गटर योजनेसह कोटेश्‍वर पूल आणि सुमित्राराजे उद्यान पुलाच्या रुंदीकरण कामांचा शुभारंभ खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23) सकाळी 10 वा. करण्यात येणार आहे. सातारकरांना दिलेल्या शब्दांची खा. उदयनराजे यांच्याकडून वचनपूर्ती होत असल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाची भावना आहे.

कोटेश्‍वर मंदिराजवळील पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमानंतर करंजे येथे श्रीपतराव हायस्कूलजवळ, भुयारी गटर कामाचा शुभारंभ खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर सदरबझार सुमित्राराजे भोसले उद्यानाशेजारील पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या तिन्ही लोकोपयोगी कामांमुळे सातारकर नागरिकांना नजिकच्या काळात त्या त्या ठिकाणची दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच मैलासांडपाण्यामुळे होणारे प्रदुषण आणि त्याचे दुष्परिणाम यामधून सातारकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. 

सातारा नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनीही या शुभारंभ प्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन जलमंदिर पॅलेस येथून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.