Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Satara › शिबिरांच्या नावाखाली पालकांची लूट 

शिबिरांच्या नावाखाली पालकांची लूट 

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:35PMसातारा : मीना शिंदे

नृत्य, नाट्य, संगीत, कला,  छंदवर्ग, विविध मैदानी व साहसी खेळांचे कोणतेही शास्त्रशुध्द प्रशिक्षण न देता  उन्हाळी शिबीराच्या नावाखाली  अलिकडे केवळ पैसे उकळणार्‍या संस्थांचा सुळसुळाट वाढला आहे. वाढते शहरीकरण व पालकांकडून अपुरा वेळ यामुळे या शिबीरांचा व्यवसाय जोमात  सुरु असून सुमार प्रशिक्षकांव्दारे लहान मुलांना वेठीस धरण्याचे प्रकार या शिबीरांमध्ये घडत आहेत. त्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे विदारक चित्र समोर येत असल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

वाढत्या  शहरीकरणामुळे सिमेंटची जंगले वाढत चालली असून मोकळ्या जागा कमी पडू लागल्या आहेत. मुलांना खेळायला  मैदाने  उरली  नाहीत. घरात चिऊकाऊच्या गोष्टी सांगणारे आजी आजोबा आता दुर्मिळ झाले आहेत.  उन्हाळी शिबीरे आणि छंद व संस्कार वर्गांसारखे पर्याय पुढे आले आहेत. मात्र पालकांना विभक्त कुटुंबपध्दतीमुळे अनेकदा याच शिबीरांचा पर्याय समोर येतो. पालकांची ही गरज ओळखून सुट्ट्यांच्या काळात या  छंद वर्ग,संस्कार वर्ग व उन्हाळी शिबीरांचा व्यवसाय जोमात सुरु झाला आहे. सुमार प्रशिक्षण असलेल्या प्रशिक्षकांकडून या उन्हाळी शिबीरांसाठी अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते.

पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये  मुलांना काय करायचे हा प्रश्‍न कधीच सतावत नसे. कारण पूर्वी मोठे कुटुंब असे. घरात आजी आजोबा, काका काकू, ताई, आत्या अशी संस्कार करणारी मंडळी असायची. त्यामुळे मुलांवर  आचरणातूनच संस्कार व्हायचे. त्यांना वेगवेगळ्या गोेष्टी शिकायला मिळायच्या. त्यामुळे संस्कारवर्ग, छंद वर्ग तसेच उन्हाळी शिबीरे यांची गरज भासत नसे. काळाच्या ओघात हे गावचे वातावरण  आज हरवले आहे.

वाढत्या शैक्षणिक सुविधा  तसेच रोजगाराच्या शोधात नागरिकांचे लोंढे शहराकडे येवू लागले. खेडी ओस पडू लागली आणि शहरे बकाल स्वरुप घेवू लागली. त्यामुळे शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतला मामाचा गाव, गावची गंमत व गोष्टी आता इतिहास जमा होऊ लागल्या आहेत. मुलांना सुट्टीच्या काळात गुंतवण्यासाठी आणि त्यांना नवे काही शिकता यावे यासाठी  पालक  आपल्या मुलांना छंद वर्ग व उन्हाळी शिबीरांमध्ये पाठवतात. मात्र या उन्हाळी वर्गांमध्ये अव्वाच्या सव्वा फी आकारुन पालकांची लूट केली जात आहे.

उन्हाळी शिबीरामध्ये ट्रेकिंग, रेसलिंग, पोहणे, विविध खेळांचे प्रशिक्षण याचा  समावेश असतो.  काही शिबीरे निवासी असतात. त्यामध्ये सहभागी मुलांना चहा, नाष्टा व भोजनाची सोय करण्यात येते. त्यासाठी भरलेल्या फीच्या तुलनेत  जेवण व नाष्ट्याची  गुणवत्ता व  पौष्टिकता नसते. अनेकदा  शिबीरांमध्ये शिकवण्यात येणार्‍या खेळ किंवा कलाकृतीमध्ये  कलाकौशल्यांचा अभाव असतो. एकाच दिवसात अनेक खेळ, कला कृतींचे प्रशिक्षण दिले जाते. केवळ शिबीरातील दिवस भरुन काढायचे म्हणून सर्व खेळ किंवा साहसांचे प्रात्यक्षिक दिले जाते.

दहा ते पंधरा दिवसांमध्ये  मिळालेल्या प्रशिक्षणाने  शिकलेल्या खेळात निपुणता येणे शक्य नसते. छंद वर्गामध्ये  योगा, क्राप्टींग, आरोमा, चित्रकला शिबीरांमध्ये ठराविक  अभ्यासक्रम घेवून केवळ शिकवण दिली जाते. मात्र, या शिकवणीमध्ये कौशल्य कितपत मुलांनी आत्मसात केले याचे मूल्यमापन होत नाही. हीच स्थिती संस्कार वर्गांचीही आहे. याबाबत आता केवळ पालकांनीच लक्ष देवून आपल्या पाल्याची वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती घडवून आणण्याची गरज व्यक्‍त केली जात आहे. 

 

Tags : satara, satara news, camp, parents Loot,