Thu, Apr 25, 2019 17:35होमपेज › Satara › सत्यजितसिंह पाटणकर यांचा कस लागणार

सत्यजितसिंह पाटणकर यांचा कस लागणार

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 08 2018 9:11PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ 

सातत्याने सत्तेत राहिलेल्या पाटणच्या राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाला आता भा. ज. प. व शिवसेना सत्तेविरोधात जनआंदोलन करावे लागत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधातील पक्षाच्या वतीने करण्यात येणार्‍या हल्लाबोल आंदोलनाची जय्यत तयारी सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील झाली आहे. निश्‍चितच या आंदोलनाच्या निमित्ताने येथे या नेतृत्वाचा पक्ष आणि जनता या दोन्हीसमोर कस लागणार आहे. 

गेली अनेक वर्षे सातत्याने या ना त्या प्रकारे सत्तेत रहाणारा पाटणकर गट. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीतून विधानसभेची उमेदवारी करणार्‍या सत्यजितसिंह यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर यापूर्वी अपवादात्मक परिस्थितीत पाटणकर गटाचा स्थानिक पातळीवर पराभव झाला तरीही देश अथवा राज्यपातळीवर राष्ट्रवादी पक्षांच्या विचारांची सत्ता असल्याने मग विकासकामात कोणताही अडथळा यायचा नाही. याच जोरावर पुन्हा गेलेला विजय पुन्हा परत आणता येणेही शक्य व्हायचे. तर त्याकाळात विक्रमसिंह पाटणकर यांची महत्वपूर्ण राजकीय, सामाजिक व विकासात्मक धोरणेही तितकीच कामी यायची. मात्र 2014 मध्ये एका बाजूला तालुक्याची आमदारकी तर गेलीच शिवाय पक्ष अथवा मित्र पक्षांच्या राज्य व केंद्रातील सत्ताही गेल्या तर विक्रमसिंह पाटणकर यांचा कमी झालेला राजकीय प्रवास यामुळे येथे निश्‍चितच पाटणकर गट हा कमालीचा पिछाडीवर जाण्याची भिती तालुक्यातील जनताच न्हवे तर अगदी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही व्यक्त केली होती. 

सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर हा सार्वत्रिक भार व तितकीच मोठी जबाबदारीही पडली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे मुळापासूनच काढण्याच्या दृष्टीने त्यांनी शांत, संयमी स्वभाव व गनिमी काव्याने अगदी छोट्या मोठ्या निवडणुकांवर बारिक लक्ष ठेवत  ‘च्या सह’ किंवा ‘च्या शिवाय’ हे धोरण अवलंबिले. विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती ना. रामराजे निंबाळकर, माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे आदींच्या सहकार्यातून येथे सत्ता असताना जे शक्य न्हवते ते सत्ता नसतानाही शक्य करून दाखविले. सुरूवातीला बाजार समिती निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून आपल्याकडेच ज्यादा ग्रामपंचायतींचा आ. देसाई यांचा हा दावा मोडीत काढला.

जिल्हा बँकेत एकतर्फी विजय मिळविला. पाटण नगरपंचायतीमध्ये एकहाती सत्ता घेतली, आजवर मित्रपक्षांच्या सहकार्यातून पंचायत समितीची सत्ता ठरायची मात्र ते समिकरणही मोडीत काढत येथे एकतर्फी राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित करत सभापती, उपसभापती आपल्याच विचारांचा केला. जिल्हा परिषदेत सातपैकी चार ठिकाणी अनपेक्षित मताधिक्य मिळवले व येथे शिक्षण व अर्थ समिती सभापती पदाची माळ राजेश पवार यांच्या गळ्यात टाकली.

ग्रामपंचायतींच्या जेवढ्या निवडणूका झाल्या तेथेही कमालीचे सत्तांतर व आघाडी मिळवली. जेथे सत्ता असतानाही शक्य झाले नाही ते सत्यजितसिंह पाटणकर येथे सत्ता नसतानाही एकतर्फी शक्य करून दाखवत राष्ट्रवादीला कमालीची बळकटी दिली. आता या तालुक्याला व राज्य तथा देशालाही राष्ट्रवादी विचारांची तितकीच महत्वाची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर व 2019 च्या निवडणुकांसाठी हे हल्लाबोल आंदोलन महत्वाचे ठरणार असल्याने यानिमित्ताने पुन्हा सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाचा सार्वत्रिक कस लागणार हे निश्‍चित मानले जात आहे.

 

Tags : Patan, Patan news, Satyajejsingh Patankar, ncp hallabol movement,