होमपेज › Satara › पाटणमध्ये स्वच्छतेला अस्वच्छतेचा आहेर

पाटणमध्ये स्वच्छतेला अस्वच्छतेचा आहेर

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 10:17PMपाटण : प्रतिनिधी

पाटण ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली खरी, मात्र स्थानिक नागरिकांच्या मानसिकता काही केल्या बदलायला तयार नाहीत. नगरपंचायत प्रशासन सेवा, सुविधांच्या नावाखाली नक्की कोणाचा विकास करतयं हे त्यांच त्यानांही समजत नाही. स्वच्छतेसाठी शहरातील रंगविलेल्या भिंतीशेजारीच कचरा टाकला असल्याने स्वच्छतेच्या कामाला अस्वच्छतेचा आहेर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. 

पाटणच्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, खरी मात्र त्याचा नक्की फायदा की तोटा ? हे किमान आजवर तरी कोणालाच समजले नाही. विकास कामांची कोट्यवधीची उड्डाणे ऐकायला मिळाली. पण तो खरा विकास अपवादात्मकच पहायला मिळत आहे. तर सुविधा व सुधारणांच्या नावाखाली कचरा कुंड्या, फिरती शौचालये, पाण्याच्या मोटारी व अन्य बाबींसाठी खर्ची पडलेला किंवा पाडलेल्या याच निधीतून नक्की कोणाचे कल्याण व कोणाचा विकास झाला ? हा सध्यातरी संशोधनाचा व संशयाचा विषय बनला आहे. नेते मंडळीच्या अथक परिश्रमातून व विरोधी शासन असताना निधी मिळवताना होणारा त्रास याचे स्थानिक पातळीवर कोणालाही घेणे - देणे नाही. जो तो केवळ शहर, प्रभाग यापेक्षा आपला विकास कसा होईल? यावर लक्ष ठेऊन असल्याचे अनेकदा पहायला मिळते. एका बाजूला शासन किंवा स्थानिक नगरपंचायत स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असली तरी त्याचे नागरिकांनाही काहीच घेण - देणे नसते. 

कोट्यवधीचा खर्च करून येथे नगरपंचायतीजवळच भाजी मंडई करण्यात आली. मात्र येथेच सर्वाधिक कचरा असतो. याला नागरिकांपेक्षाही त्या ठिकाणच्या भाजी विक्रेते व व्यापारीच जास्त जबाबदार आहेत.अत्याधुनिक मंडईची पुरती वाट लावली असून शिल्लक भाजीपाला हा तसाच मंडई परिसरात टाकला जातो. कुजलेल्या व सडलेल्या याच भाज्यामुळे मग दुर्गंधी, डास यामुळे सर्वांचेच आरोग्य धोक्यात येते. मात्र हे सगळे निमुटपणे पहाण्यातच नगरपंचायत प्रशासन, पदाधिकारी व मेहरबानांना ही धन्यता वाटते. त्यामुळे यातूनच बोध घेऊन जर काही सुधारणा झाल्या, तरच मग या भिंती स्वच्छतेचा खरा संदेश देतील आणि नागरिकही त्याला मनापासून स्विकारतील, हे निश्‍चित.

मानसिकता बदलण्याची गरज ...

केवळ भिंती रंगवून येथे स्वच्छता होणार नाही. तर त्यासाठी आधी स्वतःची, नंतर गावाची मानसिकता स्वच्छ करणे गरजेचे आहे. अन्यथा मग प्रशासनाने रंगवलेल्या याच भिंतीशेजारीच झालेला कचरा व थुंकीच्या पिचकार्‍या याच प्रशासनाच्या, नगरपंचायतीच्या कामाचे प्रशस्तीपत्र बनतील, अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत.