होमपेज › Satara › उंब्रजच्या बेपत्ता पैलवानाचा खून झाल्याचे निष्पन्न

उंब्रजच्या बेपत्ता पैलवानाचा खून झाल्याचे निष्पन्न

Published On: Feb 16 2018 1:49AM | Last Updated: Feb 15 2018 11:21PMसातारा : प्रतिनिधी

गायकवाडी (ता. कराड) येथील बेपत्ता झालेल्या पैलवान किशोर रामचंद्र गायकवाड (वय 29) यांच्या अपहरणनाट्याचा पोलिसांनी अखेर आठ महिन्यांनंतर छडा लावला असून किशोर याचा उसण्या घेतलेल्या पैशाच्या तगाद्यातून सुटण्यासाठी निर्घृणपणे खून केल्याचे समोर आले आहे.  किशोरचा  वायरने गळा आवळून व डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्यात आला. नंतर मृतदेह विशाळगडाच्या जंगलात टाकल्याचेही स्पष्ट झाले. या खुनाचा पर्दाफाश सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केला. संशयित आरोपींमध्ये सर्जेराव राजवस-सावंत ऊर्फ महाराज (कडेगाव, जि. सांगली) हा  मुख्य सूत्रधार असून त्याची टोळी ‘रेडीएशन पॉवर’द्वारे भोंदूगिरी करत असल्याचे समोर आले आहे.

सर्जेराव सावंत महाराज, राहुल मारुती शिंदे (वय 36, रा. नेर्ले ता. वाळवा, सांगली)  व सागर बाळू देसाई (रा. तडसरवाडी, ता. कडेगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यातील राहुल शिंदे हा सर्जेराव सावंत ऊर्फ महाराज याचा मेहुणा आहे. सावंत महाराज हा मूळचा तडसरवाडीचा असून हल्ली तो सैदापूर, कराड येथे राहत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तपासाबाबतची माहिती पत्रकार  परिषदेत माहिती दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किशोर गायकवाड हे दि. 13 जुलै 2017 रोजी स्कॉर्पिओसह बेपत्ता झाले होते. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही सापडत नसल्याने ते बेपत्ता झाले असल्याची तक्रार उंब्रज पोलिस ठाण्यात दाखल झाली. मात्र उंब्रज पोलिसांनाही त्याचा छडा लागत नसल्याने गायकवाड कुटुंबियांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेवून कैफियत मांडली. एलसीबीच्या पथकाकडे याप्रकरणाचा तपास आल्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार केली.

पारंपरिक तपासामध्ये यश येत नसतानाच अखेर मोबाईलच्या तांत्रिक तपासामध्ये पोलिसांना सुगावा सापडला. पोलिसांचा एकीकडे तपास सुरु असतानाच किशोर गायकवाड यांच्या भावाने नुकतीच अज्ञाताविरुध्द अपहरणाची पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याचदरम्यान एलसीबीचा तपास गतीमान झाला व बुधवारी संशयित तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तिघांकडे कसून चौकशीला सुरुवात केल्यानंतर तपासामधील माहिती ऐकून पोलिसही थक्क झाले व हडबडून गेले.

संशयित तिघेही रेडीएशन पॉवरचा व्यवसाय करत असताना किशोर गायकवाड यांची ओळख झाली होती. संशयितांनी गायकवाड याच्याकडून या व्यवसायासाठी 11 लाख रुपये उसने घेतले होते. पैसे दिल्यानंतर ते वेळेत मिळत नसल्याने किशोर गायकवाड याने महाराजाकडे पैशाचा तगादा लावला. तो महाराजाच्या वारंवार घरी जावून दमदाटी करत होता. या सर्व प्रकाराला महाराज वैतागला व त्याने इतर दोन साथीदारांसोबत कट रचला. संशयित तिघांनी किशोर गायकवाड याला पैसे देतो असे सांगून बोलावून घेतले. वर्दळ नसलेल्या ठिकाणी बोलावून वायरने अगोदर गळा आवळला त्याचवेळी लोखंडी रॉडने हल्ला करुन खून केला.

खून केल्यानंतर किशोर गायकवाड यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महाराजाने आणलेल्या कारमधून विशाळगड जंगलात मृतदेह फेकून दिला. या घटनेचा कोणालाही संशय येवू नये, यासाठी संशयितांनी किशोर यांचा मोबाईल मुंबई, पुणे, नाशिक, नगर याठिकाणी फिरवून तो नंतर टाकून दिला. तसेच किशोर यांची कार अकलूज अडगळीच्या शेतात सोडून दिली. गेल्या दोन दिवसांपासून एलसीबीचे पथक अहोरात्र याप्रकरणाचा गुंता सोडवत असून आठ महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा अखेर छडा लावला.