सातारा : विठ्ठल हेंद्रे
थंड डोक्याच्या बुवा महाराजाने पचवला आठ महिने खूनसातारा : विठ्ठल हेंद्रे उंब्रजचा पैलवान किशोर गायकवाड यांच्या खून प्रकरणाचा उलगडा करताना पोलिसांची बरीच दमछाक झाली. बेपत्ता झाल्यानंतर किशोर यांचा मोबाईल वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरु असल्याचे लोकेशन दिसत असल्याने सातारा पोलिस चक्रावले होते. फिरवाफिरवी, घुमवाघुमवीचा पोलिसांना अंदाज येवू लागल्यानंतर याप्रकरणात वाई हत्याकांडातील आरोपी डॉ. संतोष पोळ याने केलेल्या दिशाभुलीचा व दृष्यम चित्रपटाचा ‘अनुभव’ आला. थंड डोक्याचा कावेबाज असणार्या कडेगावच्या सावंत या बुवा महाराजाचे पितळ सातारा पोलिसांनी उघडे पाडले. दरम्यान, महाराज हा भानगडीबाज असून त्याने विधानसभा निवडणूकही लढवली असल्याचे समोर आले आहे.
किशोर गायकवाड यांच्या अचानक बेपत्ता होण्याने आठ महिने कुटुंबिय, मित्र परिवारामध्ये काहूर उठले होते. दोन-चार दिवसात किशोर सापडतील अशी कुटुंबियांची आशा होती. किशोर गायकवाड यांच्या बेपत्ताचे गूढ उकलणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. कोणताही धागा नसताना व मोठा कालावधी गेल्याने पोलिस सर्व बाजूने तपास करत होते. दुर्देवाने आता त्यांचा खून झाला असल्याचे समोर आले आहे. दरम्यानच्या काळात मात्र त्यांच्याबद्दलही कमालीचे गूढ निर्माण झाले होते. घटनेपूर्वी किशोर हे पुणे येथे आरटीओ एजंट व वाळूचाही व्यवसाय करत असल्याचे समोर आले. त्या आधारेही तपास घेण्याचा प्रयत्न करुन शोधण्यासाठी पोलिसांनी हरएक प्रयत्न केल्यानंतरही त्यात यश आले नाही.
पोलिसांनी अखेर मोबाईल लोकेशनवरून तपासाची दिशा निश्चित केली. त्यानुसार मोबाईलच्या तांत्रिक तपासामध्ये धागादोरा लागला. पोलिस या प्रकरणाच्या जवळपास पोहचले. त्यानुसार संशयितांवर वॉच ठेवण्यात आला व ताब्यात घेतल्यानंतर महाराज हा कमालीचा शातीर असल्याचा पोलिसांना अनुभव आला. ज्या पध्दतीने दीड वर्षापूर्वी वाई येथे सहा खून केल्याचे डॉ.संतोष पोळ याने कबुली देवून महाराष्ट्राला व देशाला हादरवून सोडले त्याच पध्दतीने कडेगावचा हा भोंदू महाराज देखील ‘थंड’ डोक्याचा असल्यानेच त्यानेही आठ महिने हा खून पचवला.
मृत किशोर गायकवाड यांना जिवंत भासवण्यासाठी त्यांचा मोबाईल संशयितांनी ठिकठिकाणी फिरवला. त्यांची स्कॉर्पिओ कारही दुर्गम भागात सोडून दिली होती. तसेच सर्वात धक्कादायक म्हणजे किशोर गायकवाड यांचा मृतदेहच कोणाच्या हाती लागू नये यासाठी विशाळगड या जागेची निवड केली होती. या सर्व भानगडी तपासात समोर येवू लागल्यानंतर पोलिसांना डॉ.संतोष पोळ याची थिअरी आठवली. तसेच नुकताच येवून गेलेला दृष्यम चित्रपटातील कथानकाचाही अनुभव पोलिसांना आला.