Sun, Mar 24, 2019 04:47होमपेज › Satara › पोटासाठी बहुरूप्यांची धडपड

पोटासाठी बहुरूप्यांची धडपड

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 7:27PMउंब्रज  : सुरेश सूर्यवंशी

टिक, टिक कोण आहे का घरात? हॅलो मी एसीपी, सीआयडी फ्रॉम ऑल इंडीया. पश्‍चिम बंगालच्या होमगार्ड डिपार्टमेंट मधून आपल्या चौकशीचे आदेश आले आहेत. घरात एकूण लोक किती आहेत ? किती भाकरी केल्या? भाजी कोणती केली ? तोंडी लावायला लोणचे होते का? अशा शाब्दीक कोट्या करून घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खळखळून हसवणारा बहुरूपी व्यक्तीगत जीवनात मात्र उपेक्षित राहिला आहे. उंब्रज बाजारपेठेतून फिरणारे बहुरूपी नारायण रामचंद्र माहुरे वय 52 (रा.आंबेघरी खुर्द जि.यवतमाळ) येथील असून ते सध्या रामकृष्णनगर (ता.जि.सातारा) येथे वास्तव्यास आहेत.

आपल्या बहुरूपी व्यवसायाबद्दल बोलताना नारायण माहुरे यांनी बहुरूपी हा व्यवसाय वडीलोपार्जित चालवित असून, या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे सांगितले. आज बहुरूपी कला लोप पावत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कधी पोलिस, कधी हनुमान तर कधी राम - लक्ष्मण यासह विविध वेशातील सोंगे घेऊन लोकांची करमणूक, मनोरंजन आणि त्यातून प्रबोधन करण्याचा उद्देश असतो. धान्य, कपडे, पैसे यापूर्वी मिळत होते आता सोसायट्यांमध्ये येऊही देत नाहीत. लोक टिंगल करतात तेंव्हा दुःख होते.  कधीकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला बहुरूपी आज उपेक्षितांचे जीवन जगत आहे. बहुरूपी कला जिवंत रहावी यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा माहुरे यांनी व्यक्त केली.