Tue, Mar 26, 2019 07:39होमपेज › Satara › ‘येळकोट’च्या गजरात खंडोबा-म्हाळसा विवाह

‘येळकोट’च्या गजरात खंडोबा-म्हाळसा विवाह

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 9:57PM

बुकमार्क करा
उंब्रज : प्रतिनिधी

‘येळकोट येळकोट, जय मल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष, भंडारा-खोबर्‍याची उधळण अन् लाखो भाविकांच्या साक्षीने सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा-खोबर्‍याच्या उधळणीने पालनगरी पिवळीधमक झाली होती. दुपारी पावणेतीनच्या सुमारास देवस्थानचे मानकरी देवराज पाटील यांच्या रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून तासाभराने मानकरी देवराज पाटील हे देवास पोटास बांधून अंधार दरवाजाजवळ आले. त्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. 

फुलांनी सजविलेल्या छत्र्या, चोपदाराचा घोडा, सासनकाठी, पालखी, मानाचे गाडे व त्यापाठोपाठ राजेशाही थाटात श्री खंडोबा व म्हाळसा यांना रथातून   घेऊन निघालेले मानकरी अशी भव्य दिव्य शाही मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबर्‍याची उधळण केली. यावेळी लाखो भाविकांकडून ‘यळकोट यळकोट, जयमल्हार’च्या जयघोष सुरू होता.  तारळी नदी पात्रातील दक्षिण पात्र भाविकांनी खचाखच भरले होते. तसेच हे पात्र भंडार्‍याच्या उधळणीमुळे अक्षरश: पिवळे धमक झाले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास मुख्य मिरवणूक तारळी नदी पात्रातून मारूती मंदिर मार्गे बोहल्याजवळ आली. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले. मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपारीक पध्दतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.