Fri, Mar 22, 2019 07:41होमपेज › Satara › खासगी वाहनांमुळे महामार्गावरील उंब्रज मृत्यूसापळा

खासगी वाहनांमुळे महामार्गावरील उंब्रज मृत्यूसापळा

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 9:12PM

बुकमार्क करा

उंब्रज : सुरेश सूर्यवंशी

महामार्गावरील थांब्यावर एसटीच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी आणि याच ठिकाणी लांब पल्याची खासगी वाहतूक करणारी वाहनेही उभी रहात आहेत. महामार्गावर खासगी वाहतुकीसाठी स्वतंत्र थांबा करावा जेणेकरून प्रवाशांना खासगी वाहनाचा त्रास होणार नाही, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून केली जाऊ लागली आहे.  

रस्ते विकास महामंडळाने याठिकाणी वाहने थांबवून प्रवासी चढ - उतार करण्यास सक्त मनाई  असल्याचा फलक लावला आहे मात्र या फलकाची अंमलबजावणी अद्याप तरी कोणत्याही वाहनधारकाने केली असेल असे वाटत नाही. महामार्गावर खासगी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी शिस्तीचे पालन करावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे, असा सज्जड इशारा ग्रामपंंचायतीच्या ग्रामसभेत यापूर्वी ग्रामस्थांनी दिला होता. 

मात्र खासगी वाहनधारकांनी नव्याचे नऊ  दिवस याप्रमाणे पुन्हा मागचे तेच पुढे करून महामार्गावर थांबा केला आहे. खासगी वाहनांची महामार्गावर लागणारी रांग ही पाठीमागून येणार्‍या एसटी चालकांना डोकीदुखी ठरत असून, एसटी चालकास प्रवाशी उतरण्यासाठी व घेण्यासाठी महामार्गाच्या जवळपास मध्यावर एसटी उभी करावी लागत आहे. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनांचा ताबा सुटून अपघातासारख्या घटना घडत आहेत. तीन वर्षापूर्वी पारगांव खंडाळा येथे खाजगी वाहनधारकाच्या चुकीमुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर तात्कालिन जिल्हाधिकारी यांनी तातडीने एसटी महामंडळास महामार्गावर एसटी उभी न करण्याचा आदेश देत लांब पल्याच्या सर्व एसटी बसस्थानकात नेण्याचे आदेश दिले होते. महामार्गावर एसटी थांबल्यास पोलिसांना कारवाई आदेश दिले होते. या आदेशाचे पालन एसटी महामंडळाने व पोलिसांनी काही दिवसच केले व पुन्हा मागचे तेच पुढे झाले. हीच  परिस्थिती आजअखेर सुरू आहे. 

एकंदरीत काही तांत्रिक अडचणीमुळे लांब पल्याची एसटी बसस्थानकात येवू शकत नाही ही वस्तुस्थिती असली तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी व खाजगी वाहतुक यांचे स्वतंत्र थांबे आवश्यक आहेत असेच म्हणावे लागेल.