Thu, Mar 21, 2019 15:38होमपेज › Satara › उंब्रजचे बसस्थानक; गैरसोयीचे आगार

उंब्रजचे बसस्थानक; गैरसोयीचे आगार

Published On: Jul 02 2018 1:49AM | Last Updated: Jul 01 2018 8:07PMउंब्रज : सुरेश सूर्यवंशी

पंतप्रधान सुवर्ण चौरस योजनेतून साकार झालेल्या चौपदरीकरणांतर्गत उंब्रजमध्ये साकार झालेल्या भराव पूलाचा फटका ग्रामस्थ, व्यापारी यांच्याबरोबर एसटी महामंडळास बसला आहे. गेल्या पंधरा वर्षात कोल्हापूरहून पुणे, मुंबईला जाणार्‍या लांब पल्याची एसटी उंब्रज बसस्थानकात न येताच महामार्गावरून सुसाट जात आहेत. दरम्यान लांब पल्याच्या एसटी बसस्थानकात येत नसल्याने भविष्यात उंब्रजचे बसस्थानक नामशेष होते आहे की काय? अशी शंका प्रवाशी वर्गाकडून व्यक्‍त केली जात आहे. 

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीच याप्रकरणी लक्ष घालून येथील प्रवाशांच्या व नागरीकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच उंब्रज बसस्थानकाचा नूतनीकरण, विस्तारीकरणाचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व प्रवाशाकडून व्यक्‍त केली जात आहे.

सातारा जिल्हयातील महामार्गावरील सर्वात मोठे व मध्यवर्ती ठिकाण म्हणून उंब्रज ओळखले जाते. मात्र निमशहरी असणार्‍या उंब्रज गावास नावाप्रमाणे अद्यावत व सर्व सोयीनियुक्‍त असे बसस्थानक आजअखेर मिळू शकले नाही. उंब्रज बसस्थानक म्हणजे एकप्रकारे समस्यांचे आगारच म्हणावे लागेल. जुनी इमारत, इमारतीच्या पाठीमागे कचर्‍याचा ढिग, बंद स्थितीत असणारे फंखे, इमारतीला अनेक वर्षापासून रंगरंगोटी नाही, इमारतीचा विस्तार नाही, प्रवाशांना पिण्याचे शुध्द पाणी नाही, दुर्गंधीयुक्‍त शौचालय, महामंडळाच्या मोकळया जागेचा शौचालयासाठी होणारा वापर असे एक ना अनेक समस्या असलेले उंब्रजचे बसस्थानक आहे. (गत महिन्यात कार्यान्वीत करण्यात आलेली सी.सी.टीव्ही यंत्रणा वगळता) उंब्रजचे बसस्थानक हे महामार्गालगत असल्याने चौपदरीकरणाचा फटका बसस्थानकालाही बसला व उंब्रजचे बसस्थानक हे सर्व्हिस रस्त्याला राहिले.

परिणामी लांब पल्याच्या एसटी बसस्थानकात न येता महा मार्गावरूनच धावू लागल्या व आजही लांब पल्याच्या एसटी महामार्गावरूनच धावत आहेत. येथील ग्रामस्थांनी, विविध संघटनानी आंदोलने करूनही एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी याकडे लक्ष दिले नाही की त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. 

भराव पूल अस्तित्वात आल्यापासून पुणे, मुंबईहून कराड, कोल्हापूरकडे जाणार्‍या लांब पल्याच्या एसटी उंब्रज बसस्थानकात न येता भराव पूलावरून धावू लागल्यामुळे प्रवाशांना विशेषतः लहान मुले, स्त्रिया यांना मोठी कसरत करून एसटी साठी भराव पूलावर खाली वर करावे लागत आहे. यामध्ये अनेक वेळा लहान मोठे अपघात होत आहेत. असंख्य गाडया उंब्रज बसस्थानकात येत होत्या. मात्र चौपदरीकरणानंतर केवळ लोकल एसटीच बसस्थानकात येत आहेत. 

मात्र संबंधित अधिकारी यांना त्याचे काय सोयरसुतक असेच म्हणावे लागेल. तर कोल्हापूरहून पुणे, मुंबईकडे जाणार्‍या एसटी कधीच उंब्रज बसस्थानकात आल्याचे प्रवाशांना आठवत नाही. एसटीचा महामार्गावरच (बेकायदेशीर) थांबा आहे. याठिकाणी खाजगी वाहनधारकांनी ठाण मांडल्याने हा थांबा अपघाताला निमंत्रण देणारा आहे, असेच म्हणावा लागेल. 

उंब्रज येथून कराडला जाणार्‍या विद्यार्थी, विद्यार्थीनींची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र वेळेत एसटी नाही, त्यातूनही एसटी आलीच तर जादा एसटी आहे, विद्यार्थी पास चालत नाही, अशी कारणे वाहकाकडून दिली जातात. हीच अवस्था कराड बसस्थानकात उंब्रजला येणार्‍या विद्यार्थ्यांची होत आहे. 

लांब पल्याच्या एसटीमध्ये विद्यार्थ्यांना घेण्यास जाणीवपूर्वक टाळले जाते. याप्रकरणी गतवर्षी उंब्रजमध्ये विविध संघटनानी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर थोडी सुधारणा झाली. मात्र पुन्हा मागचे तेच पुढे अशी परिस्थिती होत आहे व यापुढेही होईल अशी भीती विद्यार्थ्याकडून व्यक्‍त केली जात आहे. दरम्यान, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी उंब्रज येथील बसस्थानकाचा नूतनीकरण, विस्तारीकरणाचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्‍त केली जात आहे.