होमपेज › Satara › अण्वस्त्रांमुळे देश महासत्ता होत नाही

अण्वस्त्रांमुळे देश महासत्ता होत नाही

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:02PMउंब्रज : प्रतिनिधी

ज्या देशात शंभर टक्के साक्षरता,  पदवीपर्यंतचे मोफत शिक्षण व कमीत कमी बेकारी असेल, असे देशच महासत्ता आहेत. भारत देश हा महान आहे, पण तो महासत्ता नाही. तुमचे मोठेपण हे स्पर्धकावरून ठरते. देशाकडे अण्वस्त्रे आहेत, म्हणून देश महासत्ता होत नाही, असे स्पष्ट मत भालचंद्र कांगो यांनी व्यक्त केले. 

उंब्रज (ता. कराड) येथे त्रिवेणी साहित्य संमेलनात ‘भारताची वाटचाल महासत्तेकडे की नेमकी कुणीकडे?’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी प्रा. अनिल बोधे, प्रा. प्रकाश नाईक, सत्वशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कांगो म्हणाले, बाजारपेठ वाढविण्यासाठी नोटबंदी आणली. प्रत्यक्ष लहान व्यापारी यांची करामध्ये गणती होत नव्हती, ती व्हावी यासाठी जीएसटी कर प्रणालीचा फटका देण्यात आला आहे. जीएसटी म्हणजे देशाची प्रगती असे सांगण्यात आले. देशातील आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याला देश महासत्ता झाल्यास काय फायदा ? असा प्रश्‍न उपस्थित करून, तुम्ही जे श्रम करता, ते स्वतः साठी करता असे वाटावे. मात्र प्रत्यक्षात तुमच्या श्रमाची लूट करून काही लोकांना श्रीमंत करावे, अशी रचना आहे. त्या रचनेला अधार मिळावा, म्हणून भारत महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविले जात असल्याची खंत कांगो यांनी व्यक्त केली.

प्रा. बोधे म्हणाले, भारताला महासत्ता करणारे मुख्य क्षेत्र हे शिक्षण आहे. देशातील सामान्य माणूस जोपर्यंत सुखी होत नाही, तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही. माणूस संतुष्ट नसेल, तर देश महासत्ता कसा होईल ? असा प्रश्‍न उपस्थित करून सामान्य माणसांच्या जवळ जाण्याची लोकनेत्यांची भावना हे महासत्तेचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. आभार राजेंद्र सावंत यांनी मानले.

लोकशाही लोकांची नसून ‘शाही’ लोकांची ...

प्रा. नाईक म्हणाले, शिक्षण, पाणी, आरोग्य आणि विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रगती झालेला देशच महासत्तेत गणला जातो. शिक्षण क्षेत्राचे सार्वत्रिकीकरण झाले पाहिजे. नोटबंदी हा तुघलकी निर्णय असून भ्रामक खूळ पेरण्याचे काम भांडवलदार उद्योजकांकडून केले जात आहे. लोकशाही ही लोकांची नसून ‘शाही’ लोकांची झाली असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.