Tue, May 21, 2019 22:20होमपेज › Satara › उंब्रज साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

उंब्रज साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:38PM

बुकमार्क करा
उंब्रज : प्रतिनिधी

उंब्रज (ता. कराड) येथे राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलन दि. 19 ते 21 जानेवारी या कालावधीत होत असून संमेलनाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती संयोजन समिती कडून देण्यात आली.
संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश महाराव असून संमेलन येथील बाजारपेठेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळयासमोरील मैदानावर उभारलेल्या शिवसंगम साहित्यनगरीत होणार आहे.   

शुक्रवार दि. 19 रोजी सकाळी 9 वा. ग्रंथदिंडी होणार आहे. ग्रंथदिंडी रयत संकुलापासून सुरू होणार असून ग्रंथदिंडीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ होणार आहे. यामध्ये विविध शाळांचे चित्ररथ, विविध वेषभूषा केलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 

यानंतर सुनिता राजेंद्र जाधव यांचे ‘सावित्रीबाई फुले जीवन कार्य’ याविषयी व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सहा वाजता किरण भोसले व सहकारी यांचे महाराष्ट्राची संगीतमय लोकधारा हा कार्यक्रम होणार आहे. 

शनिवार दि. 20 रोजी सकाळी 10 वा. संमेलनाचे उद्घाटन, चित्रपट कलाकार हास्यसम्राट रोहीत चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश महाराव आहेत. प्रमुख उपस्थिती डॉ. मेधा पानसरे यांची आहे. याप्रसंगी स्थानिक लेखकांची दोन पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत.

दुसर्‍या सत्रात अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, प्रतिमा परदेशी यांचे परिसंवाद होणार आहेत. तर कांदबरीकार सतीश जाधव व ग्रामीण साहित्यिक शंकर कवळे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. रात्री आठ वाजता कवी संमेलन होणार आहे.

रविवार दि. 21 रोजी दोन परिसंवाद होणार असून यामध्ये भालचंद्र कांगो (औरंगाबाद) व डॉ.बी. एम. हिर्डेकर (कुलसचिव संजय घोडावत युनिव्हर्सिटी) हे सहभागी होणार आहेत.  दुपारच्या सत्रात विश्‍वनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे. यात द. श्री. जाधव, बाबासाहेब परीट, चंद्रहास शेजवळ, लालासो अवघडे हे सहभागी होणार आहेत.

सायं. 5 वा. संमेलनाचा समारोप विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड उपस्थित राहणार आहेत. बैठकीस संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.