Mon, May 20, 2019 20:04होमपेज › Satara › मद्यपीमुळे उंब्रज पोलिस ठाणे बदनाम

मद्यपीमुळे उंब्रज पोलिस ठाणे बदनाम

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 8:43PMउंब्रज : सुरेश सूर्यवंशी

काही महिन्यांपासून उंब्रज पोलिस ठाणे दारूच्या नशेत असणार्‍या कर्मचार्‍यामुळे बदनाम होऊ लागले आहे. रविवारी मद्यपीकडून होमगार्डलाच मारहाण करण्यात आली. ही घटना गंभीर असून जिल्हा पोलिस प्रमुखांनी तातडीने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

उंब्रज पोलिस ठाण्याची ‘आवो जावो, घर तुम्हारा’ अशीच काहीशी परीस्थिती झाली आहे. बाजारात चोरीस गेलेल्या मोबाईलची तक्रार गुन्हा स्वरूपात दाखल करून न घेणे,  चोरी झाली, तरी किरकोळ चोरी झाली आहे. फिर्याद कशाला देता असे सांगणे, पीएसओच्या खुर्चीत बसून तंबाखूचा बार मळत टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या आवाजात पाहणे. साहेबांच्या मर्जीतले म्हणजे आपणच पोलिस ठाण्याचे अधिकारी आहे, असे समजणार्‍या काही लोकांमुळे वाहनधारकांना होणारा त्रास, या सर्व बाबींमुळे उंब्रज पोलिस ठाणे बदनाम होवू लागले आहे.

होमगार्डला मारहाणीचे पडसाद संपूर्ण उंब्रजसह परिसरात उमटले आहेत. प्रत्येकजण विचारत आहे ‘कोण हे मारणारे’ ? गेल्या काही महिन्यापासून उंब्रज - पाटण मार्गावर नाकाबंदीच्या नावाखाली स्थानिकांना नाहक त्रास देण्याचा उद्योग या महाशयांचा सुरू आहे. स्थानिक नागरिक शेतात जाताना गाडीचे कागदपत्रे व हेल्मेट घालून जाऊ शकत नाहीत. मात्र हे महाशय वाहनधारकांशी अत्यंत अर्वाच्य भाषेत सुनावत वाहनधारकांना त्रास देत. बदली ड्रायव्हर म्हणून गेलेल्या येथील एकास विनाकारण  बेदम मारहाण केली होती. पंढरपूर येथील ऊसतोड कर्मचार्‍याकडे गाडीची सर्व कागदपत्रे असताना त्या कर्मचार्‍यास या पोलिसांच्या आडमुठेपणामुळे संपूर्ण रात्र रस्त्यावर काढावी लागली होती. असे अनेक प्रसंग सांगितले जात आहेत. 

अधिकार्‍यांनी कर्मचारी यांच्यावर अंकुश ठेवण्याबरोबरच कर्मचार्‍यांच्या यापूर्वीच्या कामांची आदलाबदल करावी. जेणेकरून इतरांनाही काही गोपनीय कामाची माहिती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच जिल्हा पोलिस प्रमुखांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.