Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Satara › खा. उदयनराजेंची भाजप मंत्र्यांशी खलबते

खा. उदयनराजेंची भाजप मंत्र्यांशी खलबते

Published On: Apr 08 2018 2:19AM | Last Updated: Apr 07 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी

सातारचे राष्ट्रवादीचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील, अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री ना.गिरीश बापट यांच्यात  शनिवारी रात्री सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर सुमारे अर्धा तास खलबते झाली. त्यानंतर भाजप कराडचे नेते अतुल भोसले यांनीही खासदारांची सुमारे 15 मिनिटे चर्चा केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आज हल्‍लाबोल आंदोलन सातार्‍यात धडकत असतानाच त्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक झाल्याने त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शनिवारी रात्री ना.चंद्रकांत पाटील व गिरीश बापट अचानक सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले. दोन्ही मंत्री डेरेदाखल झाल्यानंतर त्याठिकाणी अचानक खा.उदयनराजे भोसले हे देखील शासकीय विश्रामगृहामध्ये गेले. भाजप व खासदार समर्थक यामुळे शासकीय विश्रामगृह हाउसफुल झाले. यावेळी दोन्ही मंत्र्यासह खासदार यांनी सुमारे 30 मिनिटे कमराबंद चर्चा केली. या चर्चेवेळी केवळ ते तिघेच होते. यामुळे चर्चेची नेमकी माहिती समजू शकली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजकीय पटलावर सध्या खासदार उदयनराजे यांची भूमिका चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवरही खलबते झाली आहेत. खा. उदयनराजे यांच्या वाढदिवसाला खुद्द मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस सातार्‍यात हजर होते. त्या पाठोपाठ शनिवारी पुन्हा ना.चंद्रकांतदादा व ना. गिरीश बापट हे अचानक सातारा भेटीवर येवून त्यांनी खा. उदयनराजे यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. दरम्यान, या तिघांची भेट झाल्यानंतर खा.उदयनराजे तेथून बाहेर पडले. यावेळी अतुल भोसले यांना सोबत घेवून पुन्हा दोघांनीच सुमारे 15 मिनिटे चर्चा केली. या सर्व चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर सातार्‍यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत दोन्ही मंत्री भाजप नेत्यांशी संवाद साधत होते.

Tags : satara, satara news, Udayanraje, meeting, BJP ministers,