होमपेज › Satara › ‘खासदारकीच्या निवडणूक कामाला लागा’

‘खासदारकीच्या निवडणूक कामाला लागा’

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 26 2017 1:34AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रकल्पांची उद्घाटने घेतली जाणार आहेत. आघाडीतील प्रत्येकाने नगरपालिकेत जबाबदारीने वागले पाहिजे. पदांपासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही. मात्र, आपापसात वाद न घालता लोकसभा निवडणुका जवळ आल्याने लोकांमध्ये जावून विकासकामे करा, असे स्पष्ट आदेश साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांना दिले.

सातारा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष, चार विषय समित्यांचे सभापती तसेच स्वीकृत नगरसेवकांची मुदत संपत आहे. शिवाय बजेट मंजूर झाल्यावर विकासकामांनाही नुकतीच सुरुवात झाली. या पार्श्‍वभूमीवर हॉटेल राजतारा येथे सातारा विकास आघाडीची बैठक खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 

नगरपालिकेतील पदाधिकारी निवडी तसेच शहरातील विकासकामे या प्रमुख विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीत सुरुवातीला शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सुचवलेली कामे व त्यांची सद्यपरिस्थितीची माहिती खा. उदयनराजे यांनी नगरसेवकांकडून घेतली. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन संपत असल्याने मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन खा. उदयनराजे यांनी यावेळी दिले.

शहरातील भुयारी गटर योजना, सिमेंटचे रस्ते, पोवईनाक्यावरील उड्डाणपूल (ग्रेड सेपरेटर), कास तलाव उंची वाढवणे अशा कामांची उद्घाटने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक नगरसेवकाने जबाबदारीने वागले पाहिजे. नगरपालिका सभागृहात अभ्यासपूर्ण विषय मांडा. विषयपत्रिकेवर लोकहिताचे विषय घ्या. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये मिसळून कामे करा. 

नगरपालिकेत पदाधिकारी निवडीसंदर्भात मला स्वातंत्र्य द्या. कुणाला कुठले पद द्यायचे याचा विचार केला असून प्रत्येकाला पदे मिळतील. कुणीही पदापासून वंचित राहणार नाही. आपापसात मतभेद ठेवून वाद घालत बसू नका, अशा शब्दांतही खा. उदयनराजे यांनी नगरसेवकांना सुनावले. बैठकीस सभापती, साविआ नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.