Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Satara › दम असेल तर समोर येऊन बोला : उदयनराजे 

दम असेल तर समोर येऊन बोला : उदयनराजे 

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 11:20PMसातारा : प्रतिनिधी

‘कॉलर तर मी नेहमी उडवत असतो,  इलेक्शन असो वा नसो. नाडी कोण खोलतोय, कॉलर कोण खेचतोय तेच बघतो. हिंमत असेल तर समोर या, वयाचा आदर करतो म्हणून गप्प बसतोय. माझ्यासारखा कोणी वाईट नाही, किती सहन करायचे दम असेल तर समोर येऊन विचारा’,  अशा शब्दांत खा. श्री  छ. उदयनराजे भोसले यांनी ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर पलटवार केला.

सातार्‍यात पत्रकार परिषदेत बोलताना खा. उदयनराजेे म्हणाले,  राजकारणात मी कुणाच्या आधारावर नाही. मी माझ्या स्वत:च्या  हिंमतीवर आजपर्यंत लढलो आहे. खा. शरद पवार यांच्याविषयी आपणास आदर असून तो राहणारच आहे. मी केलेली नौटंकी अनेकांना दिसते. लावणी म्हणतो, यापुढेही करतच राहणार. मी नेहमीच खरे खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझ्या वागण्यात बदल होणार नाही. मी तत्त्व सोडून बोलत नाही, माझ्या स्वभावात बदल करू शकत नाही. कामे करायला तुमचे कोणी हात बांधले आहेत का? मग का काही केले नाही? मी सत्तेत होतो, नव्हतो पण कामे करतच राहिलो ना? असेही खा. उदयनराजे म्हणाले.

रयत शिक्षण संस्थेची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितले होते की, मुख्यमंत्री असेल तो या संस्थेचा अध्यक्ष असेल. परत खासगीकरण झालं, धन्यवाद... वा देवा असंच राहू द्या, असंच चालू द्या, चांगली लोकं बाजूला काढा, आमच्याकडून काहीही अपेक्षा नाहीत.  मात्र, मानहानी होतेय, याचीच खंत असल्याचे खा. उदयनराजे म्हणाले.

‘सातारा राजधानी महोत्सव’ या कार्यक्रमातून सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मुलांना वाव मिळाला पाहिजे. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, हा या मागचा उद्देश आहे. याला कोणी राजकीय स्वरूप देऊ नये. अजूनही असा कोणीही प्रयत्न केला नाही. मुलांच्या  भवितव्यासाठी काम करत राहणार आहे. कलाकार निर्माण झाले पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ठीक आहे, कोणी आम्हाला टवाळगिरी म्हणू दे, त्याच्याबद्दल मी कुणाला भीक पण घालत नाही, पण मुलं मोठी झाली पाहिजेत. हा उत्सव माझा नसून तुमच्या आमच्या सर्वांचा आहे. एक एक कलाकारांना नाय घडवलं तर मिशा काय भुवया पण काढून टाकीन, असा टोलाही त्यांनी  लगावला.

कार्यक्रमाला अमिताभ बच्चन येणार आहेत का? या प्रश्‍नावर बोलताना खा.उदयनराजे म्हणाले, मीच अमिताभ बच्चन, कुठला अमिताभ बच्चन, त्यांचे टायमिंग बघून बघून माझेच टायमिंग लागले आहे. ते येणारच आहेत तसेच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खा. शरद पवारही येणार असल्याचे खा. उदयनराजेंनी सांगितले.  यावेळी रवी साळुंखे,  सुनील काटकर, रंजना रावत, गीतांजली कदम, पंकज चव्हाण, बाळासाहेब गोसावी, चंद्रशेखर घोरपडे व पदाधिकारी उपस्थित होते.

‘रयत’वर आ. शिवेंद्रराजेंना घ्या

रयत शिक्षण संस्थेबाबत नाराजी दर्शवत ते म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची  जागा कोणाची आहे? आहे कोण त्याच्यावर?  ही संस्था घडवण्याचे काम कोणी केले असेल तर माझ्या आजीने व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले आहे. त्याच्यावर मी नसू देत; पण राजघराण्यातील आ. शिवेंद्रराजे यांना तरी घ्या, कोणालाही घ्या, आम्हाला मेंबरपण करून घेतलं नाही. मेंबर कोणाला केलं तर प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, शशिकांत शिंदे यांना. त्यांचे काय योगदान आहे? अशा लोकांची निवड करून संस्थेने राजघराण्यावर अन्याय केल्याचा आरोप खा. उदयनराजे भोसले यांनी केला.