Mon, Apr 22, 2019 06:24होमपेज › Satara › नगरपालिकेच्या विशेष सभेसाठी ‘साविआ’ची रणनीती 

नगरपालिकेच्या विशेष सभेसाठी ‘साविआ’ची रणनीती 

Published On: Jun 19 2018 1:23AM | Last Updated: Jun 18 2018 11:02PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेची विशेष सभा प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होत असून या सभेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची बैठक जिल्हा शासकीय विश्रामृहावर घेतली. या बैठकीत नगर विकास आघाडी तसेच भाजप नगरसेवकांच्या कामांचे विषय विशेष सभेनंतर बोलावण्यात येणार्‍या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी घेण्यात येणार्‍या विषयांवर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.

सातारा नगरपालिकेत सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. मात्र, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर सातारा प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्याची नोटीस सदस्यांना मिळताच सातारा विकास आघाडीने मवाळ धोरण अवलंबले. गेली चार दिवस सुरू असलेल्या टीका-टिप्पणीनंतर सातारा विकास आघाडीने  तडजोडीची भूमिका घेतली.

सातारा प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर असलेल्या चार विषयांमध्ये विरोधकांचे विषयही घेण्यात आले आहेत. या सभेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची सोमवारी दुपारी 1 वाजता बैठक झाली. यावेळी आघाडीतील सर्व पदाधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. विशेष सभा झाल्यावर चार-पाच दिवसांत सर्वसाधारण सभा बोलावून अजेंड्यावर विरोधकांचे विषय घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 6 वाजता जिल्हा शासकीय विश्रामृहावर सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के तसेच आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवकही उपस्थित होते. खा. उदयनराजे यांनी बैठकीत शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी आघाडीच्या पदाधिकार्‍यांसोबत त्यांनी सर्वसाधारण सभा घेण्यावर चर्चा केली. त्यावेळी नगर विकास आघाडी तसेच भाजप नगरसेवकांचे तहकूब विषय मंजुरीसाठी विषयपत्रिकेवर घेण्याची भूमिका नगरसेवक तसेच पदाधिकार्‍यांनी  दर्शवली.  त्यामुळे विशेष सभा झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी सर्वसाधारण सभा घेवून विरोधकांचे विषय मंजूर केले जाणार असल्याची माहिती आघाडीतील सूत्रांनी दिली.  मंगळवारी स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आल्याने साविआच्या बैठकीत आणखीही विषयावर चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशिल  आघाडीने गुलदस्त्यात ठेवला. विरोधकांच्या विषयांवरुन रात्री उशिरपर्यंत साविआ पदाधिकार्‍यांमध्ये खल सुरु होता.