Sun, May 26, 2019 11:27होमपेज › Satara › गट-तट चालणार नाहीत : खा. उदयनराजेंकडून साविआ नगरसेवकांची चंपी 

मला निवडणूक लढवायची आहे...

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 11:46PMसातारा : प्रतिनिधी

‘तुमची निवडणूक झाली आहे. माझी निवडणूक अजून व्हायची आहे. हेवेदावे बाजूला ठेवून नाराज न करता नागरिकांची कामे करा. सर्वसाधारण सभा तसेच स्थायी सभेच्या पार्श्‍वभूमीवर घेतल्या जाणार्‍या बैठकीस कुणीही गैरहजर रहायचे नाही. बैठकांचे निरोप जलमंदिर येथून दिले जातील. आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याविना. गट-तट मला अजिबात चालणार नाहीत. इगो, प्रेस्टिज बाजूला ठेवा. ही पहिली आणि शेवटची वॉनिर्ंग आहे,’ अशा शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीतील नगरसेवकांना सोमवारी झालेल्या बैठकीत चांगलेच खडेबोल सुनावले. 

सातारा विकास आघाडीतील दोन गटांचा संघर्ष टोकाला पोहोचल्यावर आघाडीचे नेते खा. उदयनराजे भोसले यांना हस्तक्षेप करावा लागला. रविवारी दोन्ही गटांच्या नगरसेवकांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. त्यानंतर उर्वरित विषयांवर सोमवारी त्यांच्या ‘जलमंदिर पॅलेस’ या निवासस्थानी नगरसेवक तसेच अधिकार्‍यांची बैठक झाली. संबंधित नगरसेवकांची बाजू ऐकून घेतल्यावर खा. उदयनराजे यांनी नगरसेवकांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. तुमची निवडणूूक झाली आहे.  मला निवडणूक लढवायची आहे. शहरात राहणारे नागरिक माझे मतदारही आहेत. निवडणुकीला 300 दिवस राहिले असून काऊंटडाऊन सुरु झाले आहे.

शहरात सुरु असलेल्या प्रकल्प गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा. मुख्य कामे तेवढीच हाती घ्या. स्थायी तसेच सर्वसाधारण सभेच्या पार्श्‍वभूमीवर घेतल्या जाणार्‍या बैठकांना सर्वांनी उपस्थित राहिलेच पाहिजे. बैठकांसाठीचे निरोप यापुढे जलमंदिर येथून द्यायचे, अशी सूचना त्यांनी अरविंद दामले यांना केली. तुम्ही  केली नाहीत तरी मुख्याधिकारी कामे मार्गी लावतील. कुठल्याही एका नगरसेवकाचे ऐकून अधिकार्‍यांनी कामे करायची नाहीत, अशा सूचना करून  शहरात सुरु असलेल्या कामांचा आढावाही त्यांनी नगरसेवक तसेच अधिकार्‍यांकडून  घेतला.  

नागरिकांच्या हिताची कामे केली पाहिजेत. तीच कामे नगरसेवकांनी सुचवावीत. तुमचा फंड कुठे वापरायचा? कसा वापरायचा हे संंबंधित काम मला दाखवल्याशिवाय  करायचे नाही. ग्रेड सेपरेटरमुळे शहरातील रस्ते खराब होणार आहेत. आता रस्ते आणि गटरची कामे हाती घेवून फंड वाया घालवू नका. नागरिकांची इतर कामेही करा. ती कामे नगरसेवकांनी सुचवली पाहिजेत. जर तुम्हाला पटत नसेल तर माझ्या पद्धतीने प्रशासनाला व मुख्याधिकार्‍यांना  सोबत घेवून काम करतो. लोकांना नाराज करु नका, ही शेवटची तुम्हाला वॉर्निंग देतो, अशा शब्दात त्यांनी दोन्हीही बाजूच्या नगरसेवकांना चांगलेच झापले. तुमच्या निवडणुकीत मी झपाटून काम केले आहे. माझ्या निवडणुकीच्या कामाला लागा, अशा  शब्दांत त्यांनी पदाधिकार्‍यांची कानउघडणी केली.  

या बैठकीला  अधिकार्‍यांकडून  आढावा घेण्यात आला. या  बैठकीस नगरसेवक राजू भोसले तसेच नगरसेविका सुजाता राजेमहाडिक वगळता साविआचे सर्व नगरसेवक तसेच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विशाल जाधवना झापले...

नगरसेवकांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी वाढत आहेत. खुद्द नगरसेवकच एकमेकांबद्दल नेत्यांकडे पाढा वाचत आहेत. आजच्या बैठकीत नगरसेवक विशाल जाधव यांच्याबद्दल इतर सदस्यांनी खा. उदयनराजे यांच्यासमोर गार्‍हाणे मांडले. याची गंभीर दखल घेत उदयनराजेंनी बैठकीतच विशाल जाधव यांना झापले. कोण प्रोफेशनल आहे कोण पैसे कमवायला आलेय, प्रभागात कोण असतो आणि लोकांची कामे कोण करतो हे माहीत आहे, असे सांगत आरोग्य विभागातील ठेक्यांवरुनही झाडाझडती झाली.