Sat, Jun 06, 2020 01:15होमपेज › Satara › कृष्णाकाठी हादरा अन् उंडाळकरांची जादू

कृष्णाकाठी हादरा अन् उंडाळकरांची जादू

Published On: May 26 2019 1:47AM | Last Updated: May 25 2019 10:51PM
कराड ः चंद्रजित पाटील

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जवळपास 40 ते 50 हजारांचे मताधिक्य मिळेल, असा आत्मविश्‍वास युतीला होता. कोळे, उंडाळे, काले परिसरात उंडाळकर गटाने ताकद दाखवून देत ना. नरेंद्र पाटील यांना मताधिक्य दिले आहे. मात्र प्रत्यक्षात कराड शहरासह कृष्णाकाठच्या भाजपाच्या बालेकिल्ल्यात आ. पृथ्वीराज चव्हाण, जनशक्ती तसेच लोकशाही आघाडीचा यांचा करिष्मा पहावयास मिळाल्याने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जोरदार मुसंडी मारत मताधिक्य मिळवले आहे. दुसरीकडे वारूंजी विभागात आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह काँग्रेसच्या ताकदीचा राष्ट्रवादीला  फायदा झाला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील मताधिक्याबाबत प्रथमपासून उत्सुकता होती. निकालानंतर आता वहागाव, खोडशी, घोणशी,  वारूंजी, विजयनगर या विभागात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि आ. बाळासाहेब पाटील गटामुळे उदयनराजे भोसले यांना मताधिक्य मिळाले आहे. तर वनवासमाची येथे नरेंद्र पाटील यांना केवळ 4 मतांची तर वनवासमाचीत 150 मतांची आघाडी मिळाली आहे, हीच या विभागातील एकमेव जमेची बाजू आहे.

तर मागील विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांना केवळ 225 मतांची आघाडी देणार्‍या कोळे, तारूख, चचेगाव, येरवळे विभागात उंडाळकर गटाने पुन्हा एकदा ताकद दाखवून दिल्याने नरेंद्र पाटील यांना घारेवाडी, आणे, कोळे, शिंगणवाडी, कुसूर, कोळेवाडी, तारूख, वानरवाडी, बामणवाडी, येणके, येरवळे या गावात मताधिक्य मिळाले आहे. या विभागात किरपे आणि पोतले या दोन गावांनी मात्र उदयनराजे भोसले यांनाच साथ केली आहे.

तर सर्वाधिक मताधिक्यांची अपेक्षा असलेल्या युतीला कृष्णाकाठच्या बालेकिल्यात अक्षरशः सुरूंगच लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप यांना त्यांचे बंधू जयवंतराव जगताप यांच्यासह अविनाश मोहिते गटाने या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा वडगावमध्ये पिछाडीवर टाकले आहे. आटके, वाठार, शेरे, बेलवडे बुद्रूक, दुशेरे, गोंदी, खुबी या गावातही उदयनराजे भोसले यांनी मताधिक्य मिळवत युतीवर आत्मचिंतन करण्याची वेळ आणली आहे. रेठरे बुद्रूक येथील दीड हजारांचे मताधिक्य हीच युतीसाठी जमेची बाजू असली तरी शेणोलीत उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांना मिळालेली समान मतेही चर्चेचा विषय बनली आहेत. काले विभागातील गावांमध्ये नरेंद्र पाटील यांनी मताधिक्य मिळवले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या विभागातही उंडाळकरांना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार टक्कर दिली होती. 

उंडाळे, येवती, येळगाव परिसरात विलासराव पाटील - उंडाळकर गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूर, गोवारे, सैदापूर या विभागात राष्ट्रवादीचाच बोलबोला राहिला असून आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील हे उदयनराजे भोसले यांच्यासाठी हुकूमाचा एक्काच ठरल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक युतीसाठी सोपी नसेल तसेच उंडाळकर गटाची ताकद काँग्रेसला दुर्लक्षित करून चालणार नाही हे दर्शवणारा हा निकाल आहे. त्याचबरोबर आ. बाळासाहेब पाटील यांच्या गटाची दक्षिणेतील जय - पराजयात निर्णायक भूमिका राहणार असल्याचे या निकालातून समोर आले आहे.

आमदारांसह नगरसेवकांच्या प्रयत्नांना यश

कराडात निवडणुकीपूर्वी काँग्रेस पदाधिकार्‍यांची वडगाव हवेलीत बैठकही झाली होती. तर पालिका राजकारणामुळे लोकशाही आघाडीबाबतही उत्सुकता होती. मात्र लोकशाही आघाडीने आ. बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेप्रमाणे जनशक्ती आघाडीच्या राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष जयंवत पाटील यांना प्रचारावेळी मदत केली. लोकशाही, जनशक्तीसह कराड दक्षिण व उत्तरमधील आमदारांच्या प्रयत्नांना यश आल्यानेच कराड शहरात मताधिक्य मिळवण्यात खासदारांना यश मिळाले आहे. तसेच संग्राम बर्गे हेही निवडणूक कालावधीत कराडात तळ ठोकून नियोजनावर लक्ष ठेऊन होेते. त्यांचा समन्वयही कामी आल्याचे निकालामुळे स्पष्ट झाले आहे.