Wed, Jul 24, 2019 12:17होमपेज › Satara › शिवेंद्रराजे खुडूक कोंबडी : खा. उदयनराजे

शिवेंद्रराजे खुडूक कोंबडी : खा. उदयनराजे

Published On: Jun 15 2018 7:33PM | Last Updated: Jun 15 2018 7:40PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील स्वच्छता कामांतील सत्यता जाणून घ्यायची असेल, तर गांधी मैदानावर समोरासमोर या. रडीचा डाव खेळू नका. त्यांचे त्या दिशेला (फलटणला) असलेल्या ब्रेनने भांडणे लावण्यापलीकडे काही केले नाही. तुम्ही खासदारकीला खुशाल उभे राहा; पण आरोप करण्यापूर्वी माझ्या कामातील पॉईंट काढा. तुम्ही शिवेंद्रराजे आहात ना, मग खुडूक कोंबडीसारखे का वागता?, अशा शब्दांत खा. उदयनराजेंनी आ. शिवेंद्रराजेंवर हल्ला चढवला. 

सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यालये बारामतीला नेण्याचा घाट घातला होता. सातारा जिल्ह्याचे भाग पाडून बारामती व कराड जिल्हे होणार होते. मी नसतो तर सातारा जिल्हा राहिला नसता, असा गौप्यस्फोटही खा. उदयनराजेंनी केला. त्यांचे नाव घेतानाही मला किळस वाटतो. जिल्ह्यात असली बांडगुळे जन्माला आली, अशा शब्दात त्यांनी रामराजेंवरही नाव न घेता टिकास्त्र सोडले. 

खा. उदयनराजे म्हणाले,  तुम्ही शोले पिक्चर पाहिला आहे का? त्यामध्ये फेमस डायलॉग आहे.  शिवेंद्रसिंहराजेंनी दाढी वाढवून वेगळा लुक केला आहे. मै नायक नही...‘खलनायक’ हूँ  हे चांगले आहे. खलनायक म्हणजे हा ‘व्हिलन’च असतो. स्पर्धा करावी तर कामातून असे वेगळे लुक करू नयेत.  मला यावर खोलात जावून बोलायचे नाही. पण दाढी वाढवून लोकांना दम देण्यापेक्षा जप करत बसा. नाही तर लोक म्हणतील सो..जा..बेटा शिवेंद्रसिंहराजे आ जायेंगे. 

ते पुढे म्हणाले,  माझ्या ओठात एक अन् पोटात दुसरे हे त्यांनी जाणल्यामुळे मी धन्यवाद देतो. मी एवढी कामे सुरू केली आहेत तरी माझ्याबद्दल एवढा दुजाभाव का? आरोप माझ्या पाचवीलाच पुजले आहेत. काकांपासून 42 वर्षे तालुक्याची सत्ता त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना सत्तेच्या सोन्याचे ताट आयते मिळाले आहे.  मला मात्र संघर्ष करावा लागत आहे. संघर्षातून उभा रहात असताना मला 22 महिने कांकामुळेच तुरूंगवास भोगावा लागला.  तरी मी काय बोललो नाही. यापुढे मी नावे घेवून कुणालाही मोठे करणार नाही. निवडणुका होत राहतील कुणीही आमदार, खासदार होईल पण आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही. बंधूराज म्हणतात की, खासदारकीला उमेदवार निवडताना पवार साहेब चुकीचा निर्णय घेणार नाहीत. त्यांनी असे विधान माझ्या बाबतीत केले की, स्वत:बाबत? आ. शिवेंद्रराजेंच्या संकुचित बुध्दीला कधी व्यापकता येणार? असा सवाल त्यांनी केला.

खंडाळा तसेच शिरवळ याठिकाणी एमआयडीसी वाढावी यासाठी लक्ष घालायला गेलो. पण व्यक्तिकेंद्रित माणूस झाल्यावर कामच होवू शकत नाही याचा अनुभव आला. त्याठिकाणी एसईझेड झोन असल्यामुळे स्थानिक मुलांना नोकरीत घ्यावे. त्यांना प्राधान्य द्यावे,अशी मागणी संबंधित कंपन्यांकडे केली. पण त्याठिकाणी प्रत्येक आमदाराचे ‘वेस्टेड इंटरेस्ट’ असल्याचे दिसून आले. त्याठिकाणच्या सोना अलाईज कंपनीचे जैन यांनाही यासंदर्भात चर्चेसाठी याठिकाणी बोलावले होते. मला त्यांना मारहाण करायची असती तर त्यांना याआधीच ठोकले असते. याठिकाणी फक्त चर्चा करण्यासाठीच बोलवले होते. पण जिल्ह्यात काही स्वयंघोषित नेते झाले आहेत. त्यांचे नाव घेतानाही मनात किळस निर्माण होते.

एवढ्या संकुचित विचाराचे काही लोक आहेत. त्या कंपन्यांमध्ये कमी पगारावर बिहारचे लोक भरले आहेत. त्यांना दहा हजार पगार ठरवायचा आणि दोनच हजार द्यायचे. अशी हजारो पोरं त्याठिकाणी काम करत असून दोन कोटी कुणाच्या खिशात जातात? असा सवाल त्यांनी केला. सातार्‍यात कुणीही यावे आणि टपल्या मारुन जावे, अशी परिस्थिती अशा माणसांमुळे निर्माण झाली आहे. इथे सगळे षंढ निर्माण झाले आहेत. एकेकाळी या जिल्ह्याने देशाला दिशा दिली. स्वातंत्र्याच्या सर्व चळवळी याच जिल्ह्यातून सुरु झाल्या. पण इथे वळवळ करणारी बांडगुळे जन्मली. जिल्ह्यात मी लक्ष घातले नसते तर सर्व कार्यालये बारामती आणि आसपासच्या जिल्ह्यात गेली असती. बारामती आणि कराड जिल्हा करुन सातारा जिल्हा खालसा करायचा प्रयत्न होता. अशावेळी आमचे खलनायक गप्प बसले. या सर्व गोष्टींना मी विरोध केला. त्यामुळे मी बोलतो असे वाटते. पण लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेणार असाल तर कोण गप्प बसेल? खलनायक आमदार गप्प बसले पण मी गप्प नाही, बसणार असा इशाराही खा. उदयनराजे यांनी दिला.

यावेळी जि.प.चे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर,  किशोर शिंदे, अशोक सावंत,  संग्राम बर्गे आदि उपस्थित होते.

कुस्ती कशाला? मला खरूज होईल 

सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात तुम्ही सामान्य उमेदवार देणार होता, त्याचे काय झाले? असे विचारले असता ते म्हणाले, निवडणुकीची ज्याला खाज असेल तो येईल. ज्याला निवडणूक लढवायची असेल तो त्यावेळी पुढे येईल. माझी खासदारकी झाली की, त्यांच्यासह उर्वरित आमदारांच्या आमदारकीच्या निवडणुकाही आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला. पवारांशी दोस्ती आणि जिल्ह्यात कुस्ती असा प्रकार सुरू आहे का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, यांच्याशी कुस्ती? मी नाय खेळणार, मला खरूज होईल ना? उगीच माझ्या स्कीनला अ‍ॅलर्जी कशाला? असा चिमटाही उदयनराजेंनी काढला.