Wed, Mar 27, 2019 04:01होमपेज › Satara › अजिंक्यतारा सौंदर्यीकरण, हद्दवाढ, मेडिकल कॉलेज

अजिंक्यतारा सौंदर्यीकरण, हद्दवाढ, मेडिकल कॉलेज

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 11:21PMसातारा : प्रतिनिधी

खा. उदयनराजे कोणताही निर्णय स्वत: घेऊन त्याची अंमलबजावणीही ते स्वत: करतात. त्यामुळे खा. उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी ते मुक्‍त विद्यापीठ आहे. स्वत:साठी काहीच न मागणार्‍या उदयनराजेंनी वाढदिवशीही सातार्‍याचीच विकासकामे सुचवली. अजिंक्यतारा किल्ल्याचे सौंदर्यीकरण, सातार्‍याची हद्दवाढ आणि मेडिकल कॉलेज ही त्यांनी सुचवलेली कामे लवकरच मार्गी लावणार, अशा शब्दांत ना. देवेंद्र फडणवीस यांनी खा. उदयनराजेंना  व तमाम सातारकरांना त्यांच्या वाढदिवसाचे ‘गिफ्ट’ दिले.  दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मैदानावर उदयनराजेंच्या वाढदिवशी जनसैलाबच उसळला.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातार्‍यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनानंतर जिल्हा परिषदेच्या मैदानावरील  उदयनराजेंच्या सत्कार सोहळ्यावेळी जमलेल्या विराट जनसमुदायाला संबोधित करताना ना. देवेंद्र फडणवीस बोलत होते.  कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री विजय शिवतारे, राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्रीमंत शिवाजीराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे, पुणे आयुक्‍त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, माजी आयुक्‍त प्रभाकर देशमुख,  नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच खा. उदयनराजे यांच्यावरही  महाराष्ट्र प्रेम करतो.त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्‍त उभारलेल्या या मंचाला कोणतेही बंधन नाही. खा. उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी ते मुक्‍तविद्यापीठ आहे. विद्यापीठाचे नियम ते स्वत:च बनवतात. त्याची अंमलबजावणी ते स्वतःच करतात आणि न  ऐकणार्‍यांना शासनही ते स्वतःच करतात. मित्रांचे मित्र, प्रेमाला प्रेम देणारे, अन्यायाविरुद्ध हल्लाबोल करणारे असे उदयनराजेंचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला कायमच प्राधान्य दिले. सातार्‍यातील पोवईनाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी त्याठिकाणी  ग्रेड सेपरेटर होत आहे. त्यामुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे. सातार्‍याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच खांबाटकी बोगद्याची समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महिना-सव्वा महिन्याला कामानिमित्ताने मंत्रालयात  त्यांची भेट होत असते. पण ते स्वत:साठी काहीच न मागता जिल्ह्यासाठी, रयतेसाठी त्यांची मागणी असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

छत्रपती शिवरायांनीही हीच शिकवण दिली होती. देश मुघलांकडे गुलामगिरीत होता. मुघलांचे मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र करून राक्षसी प्रवृत्तींचा विनाश केला. सध्या त्यांच्याच विचाराने महाराष्ट्र चालत आहे. खा. उदयनराजेंची वाटचालही अशीच सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमानाचे प्रतीक असून खा. उदयनराजेंकडेही आम्ही त्यादृष्टीनेच पहातो. खा. उदयनराजेंनी आजही स्वत:साठी काहीच मागितले नाही. मात्र, अजिंक्यतारा किल्ल्याचे सौंदर्यीकरण, सातार्‍याची हद्दवाढ आणि मेडिकल कॉलेजची त्यांनी केलेली मागणी लवकरच पूर्ण करु, असा शब्द ना. फडणवीस यांनी दिला.  

दरम्यान,  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोटवर ग्रेट सेपरेटर (पोवई नाका), कास धरण उंची वाढवणे, भुयारी गटर योजना, घनकचरा प्रकल्प (सोनगाव, ता. सातारा) या अब्जावधींच्या विकासकामांची उद्घाटने करण्यात आली. याचवेळी खा. उदयनराजे यांच्यावतीने कण्हेर धरणात (ता. सातारा) सुमारे 350 कोटींच्या आंतरराष्ट्री फिश पार्कची घोषणा करण्यात आली.  स्वागत व प्रास्तविक आ. शंभूराज देसाई यांनी केले. सूत्रसंचलन सुधीर गाडगीळ यांनी केले. आभार सुनील माने यांनी मानले.

यावेळी  गजानन बाबर, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,  सुनील काटकर, अशोक सावंत, अ‍ॅड. डी.जी. बनकर, सदाशिव सपकाळ, रवी साळुंखे, गीतांजली कदम,  रंजना रावत, अनिता चोरगे, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक,संदीप शिंदे, काका धुमाळ, समृद्धी जाधव, मनोज घोरपडे, पिंटू जांभळे, विजय काटवटे, निशांत पाटील, रोहिनी शिंदे, विजय यादव, राजेंद्र यादव, विक्रमबाबा पाटणकर, सुधीर धुमाळ, प्रताप शिंदे, साहेबराव गायकवाड, भरत पाटील, दयानंद भोसले, सुशांत निंबाळकर, अमित कुलकर्णी, सुभाषराव शिंदे, शंकर गोरे, विवेक जाधव उपस्थित होते. 

उदयनराजेंसमवेत अखंड सोबत राहू : शरद पवार

खा. शरद पवार यांनी खा. उदयनराजे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, खा. उदयनराजे यांनी नेहमीच समस्यांतून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वाढदिवसापेक्षाही सामान्य माणासाच्या जीवनातील परिवर्तनाचा हा सोहळा आहे. याचाच अर्थ या देणार्‍याने नेहमीच रयतेचा विचार केला. जनता उदयनराजेंना जिल्ह्यात, राज्यात पहात असली तरी मी त्यांना दिल्‍लीत पाहतो. त्यांच्याबद्दल देशातील कानाकोपर्‍यातील खासदारांना नेहमीच औत्सुक्य वाटते. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या वंशजांना पाहायचे, भेटायचे आहे, अशी विनंती करतात. उदयनराजेंशी भेट झाल्यावर देशातील त्या खासदारांना आनंद वाटतो. इतकी विनम्रता आम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही.

त्यामुळे उदयनराजे हे सर्वात लोकप्रिय खासदार आहेत. उदयनराजे हे कमी बोलतात; पण ज्यावेळी बोलतात त्यावेळी लोकांच्या प्रश्‍नांवर, समस्यांवरच बोलतात. राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी तसेच जनतेच्या हिताच्या जपणुकीसाठी सामूहिक प्रयत्न करण्यासाठी अन्य लोकांना बरोबर घेण्याची त्यांची भावना असते. त्यांनी शिवाजी महाराजांचा नावलौकिक जगभर न्यावा. त्यांच्यासोबत सर्व घटक आहेत. त्यांना जनतेचा पाठिंबा आणि वडीलधार्‍यांचे आशीर्वाद लाभावेत. आम्ही सगळे त्यांच्यासोबत अखंड राहू, असेही  खा. पवार म्हणाले.