Wed, Feb 26, 2020 21:47होमपेज › Satara › छत्रपतींच्या जावलीत राजेंना दगाबाजी

छत्रपतींच्या जावलीत राजेंना दगाबाजी

Published On: May 25 2019 2:10AM | Last Updated: May 25 2019 2:10AM
सातारा : हरीष पाटणे

ज्या जावलीच्या दर्‍याखोर्‍याच्या भरवशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले, त्याच जावलीत पुन्हा एकदा गद्दारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना लोकसभेच्या निवडणुकीत जावलीत स्वपक्षाकडूनच दगाबाजी झाल्याची पोलखोल आकडेवारीतून पुढे आली आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात खा. उदयनराजे यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यावर सुमारे 45 हजार मतांची आघाडी घेतल्याचे दिसत असले तरी छत्रपतींच्या जावलीत वंशज उदयनराजेच 1 हजार 845 मतांनी धक्‍कादायकरीत्या पिछाडीवर गेले आहेत.

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत सातारा मतदार संघात खा. उदयनराजेंनी हॅट्ट्रिक केली आहे. 1 लाख 26 हजार 528 मतांनी उदयनराजे निवडून आले आहेत. विधानसभा मतदार संघनिहाय आकडेवारी अभ्यासली असता सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना 1 लाख 14 हजार 704 तर नरेंद्र पाटील यांना 69 हजार 447 एवढी मते मिळाली आहेत. उदयनराजेंना 44 हजार 957 मतांची आघाडी मिळाली आहे. सातारा शहरात उदयनराजेंना 44 हजार 077 तर नरेंद्र पाटील यांना 25 हजार 724 मते मिळाली आहेत. उदयनराजेंचा बालेकिल्‍ला असणार्‍या सातारा शहरात उदयनराजेंना केवळ 18 हजार 353 एवढ्या अत्यल्प मतांची आघाडी मिळाली आहे. 

सातारा नगरपालिकेवर उदयनराजेंची सत्ता आहे. शिवाय सातार्‍यात लोकसभेच्या निवडणुकीत मनोमीलनही झाले आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी यांना मिळून जेवढे मतदान झाले, त्यापेक्षा जास्त मतदान यावेळी उदयनराजेंना व्हायला हवे होते.

सातारा तालुक्यात उदयनराजेंना 46 हजार 511 तर नरेंद्र पाटील यांना 18 हजार 062 एवढी मते मिळाली आहेत. उदयनराजेंना सातारा तालुक्यात 28 हजार 449 मतांची आघाडी मिळाली आहे. सातारा शहरापेक्षा ग्रामीण भागाने मनोमीलन पाळले असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. कारण शिवेंद्रराजेंचा बालेकिल्‍ला असलेल्या सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघांमध्येही उदयनराजेंना भारी भक्‍कम मताधिक्य मिळाले आहे. 

याच्या उलट परिस्थिती जावली तालुक्यात आहे. जावली तालुक्यात उदयनराजेंना केवळ 24 हजार 116 मते मिळाली आहेत. याउलट नवख्या, मतदार संघाचा संबंध नसलेल्या नरेंद्र पाटील यांना 25 हजार 961 मते मिळाली आहेत. उदयनराजे 1 हजार 845 मतांनी पिछाडीवर राहिले आहेत. याचाच अर्थ जावलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच पक्षाच्या उमेदवाराविरोधात गद्दारी झाल्याचे आकडेवारी स्पष्टपणे सांगत आहे. 

सातारा ग्रामीण
उदयनराजे भोसले    46,511
नरेंद्र पाटील    18,062

सातारा शहर
उदयनराजे भोसले    44,077
नरेंद्र पाटील    25,724

जावली तालुका
उदयनराजे भोसले    24,116
नरेंद्र पाटील    25,961