सातारा : प्रतिनिधी
मसल पॉवरसाठी सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे दोघे जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले. मात्र, नंतर निवासी उपजिल्हाधिकार्यांच्या दालनाबाहेर पाठमोर्या उभ्या असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांना मागून येवून खा. उदयनराजेंनी धक्का मारत जिल्हाधिकारी कार्यालयातच सर्जिकल स्ट्राईक केला. लगोलग पुढे येत ‘अरे तुम्ही आहे होय’ असे म्हणत त्यांनी मिठीही मारली. मात्र, मागून धक्का व पुढुन मिठीची खमंग चर्चा रंगली.
खा. उदयनराजे सोमवारी जिल्हाधिकार्यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. आत जातानाच त्यांनी आता कुणाला आत सोडू नका, अशा सूचना प्रवेशद्वारावर दिल्या. याच कालावधीत आ. शशिकांत शिंदेही जिल्हाधिकार्यांच्या दालनाबाहेर आले. त्यावेळी आत खासदार बसले आहेत, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, दारावर थांबतील ते शशिकांत शिंदे कसले? ते तडक ‘आम्ही पण कामासाठीच आलोय’ असे म्हणत थेट जिल्हाधिकार्यांच्या दालनात घुसले.
महाबळेश्वरच्या प्रश्नांसंदर्भात दोघांनीही जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर शशिकांत शिंदे अगोदर बाहेर आले व निवासी उपजिल्हाधिकार्यांच्या दालनाबाहेर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. त्याचवेळी खा. उदयनराजे जिल्हाधिकार्यांच्या केबीनमधून निवासी उपजिल्हाधिकार्यांच्या केबीनकडे आले. शशिकांत शिंदे यांच्या जवळून जाताना त्यांनी समोर असलेल्या गर्दीच्या साक्षीने पाठमोर्या असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांना जोरात धक्का मारला. तसे शशिकांत शिंदे एकदम दचकले. त्यावर लगेचच ‘अरे कोण आहे? तुम्ही आहे होय’ असे म्हणत हसत त्यांनी मिश्किलपणे शशिकांत शिंदेंना मिठी मारली.
उदयनराजेंच्या या सर्जिकल स्ट्राईकने शशिकांत शिंदेही दचकले. लगेचच प्रसंगावर कमांड घेत खा. उदयनराजे म्हणाले, ‘दोनच मिठ्या लक्षात राहतील, एक संसदेतील आणि दुसरी जिल्हाधिकारी कार्यालयातील.’ उदयनराजेंच्या या विधानावर जोरदार हशा पिकला. ‘दिला की नाही आमच्या महाराजांनी तुमच्या साहेबांना धक्का’ अशा प्रतिक्रिया लगेचच कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.