होमपेज › Satara › खासदार उदयनराजेंच्या सूचना म्हणजे अधिकार काढून घेणे नव्हे : राजेशिर्के

खासदार उदयनराजेंच्या सूचना म्हणजे अधिकार काढून घेणे नव्हे : राजेशिर्के

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीची स्थापना केली आहे. सातारा नगरपरिषदेच्या लोकनियुक्‍त  नगराध्यक्षांसह बहुमताची सत्‍ता खा. उदयनराजे भोसले यांच्याकडे पाहून सातारकर नागरिकांनी साविआकडे सोपवली आहे.  आघाडीचे नेते म्हणून प्रत्येक निर्णय आम्हाला सांगितल्याशिवाय घ्यायचा नाही, अशी खा. उदयनराजे भोसले यांनी आम्हास केलेली सूचना  म्हणजे कुणाचे अधिकार काढून घेतले असे होत नाही, असा प्रतिटोला सातारचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी अशोक मोने यांना लगावला आहे.

खा. उदयनराजे भोसले यांनी त्यावेळी प्रस्तावित केलेली  कण्हेर उद्भव योजना त्यांना श्रेय मिळेल म्हणून ती डावलून शहापूर योजना तुम्ही आणली. शहापूरचा आज उपयोग होत असला तरी ती योजना सातारकरांवर लादलेली योजना आहे. कण्हेर योजनेच्या तुलनेत प्रचंड खर्चिक असलेली शहापूर योजना तुमच्याच कर्तृत्वाने सातारकरांच्या माथी मारली गेली. कोटेश्‍वर पुलाचे काम मनोमिलनाच्या सत्तेत मंजूर झालेले आहे. भुयारी गटर, घनकचरा व्यवस्थापन, कास धरण आदी कामे मंजूर असली तरी ही सर्व कामे साविआच्याच  कार्यकाळात सुरु झाली. शाहूपुरी पुलाचे  काम सुरु आहे. या कामामुळे शाहूपुरीकरांची थोडी गैरसोय होत आहे. तथापि हे  काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर आमचे लक्ष आहे. सातारा शहरात साठणारा कचरा सार्वजनिक ठिकाणी साठू नये म्हणून घंटागाड्या कार्यक्षमतेने सुरु आहेत. नगरपरिषदेचा डंपिंग स्पेसर काही दिवस बंद असल्याने व पावसाळ्यामुळे कचर्‍याचे प्रमाण वाढल्याने शहरात एक दिवस कचरा उचलला गेला नाही. तथापि गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा चांगल्या पध्दतीने कचरा गोळा करुन डंपिंग केला जात आहे, असेही सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.

कास धरण उंची वाढवण्यासाठी ज्या काही केंद्राच्या वन विभागाच्या  आणि हरित लवादाच्या मंजुर्‍या मिळाल्या आहेत त्या केवळ खा. उदयनराजे भोसले यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मिळाल्या आहेत.  मुळ प्रस्ताव खासदार महोदय यांचा आहे. त्यामुळे अशोक मोने तुम्ही अर्धसत्य सांगून  श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी तो तुमच्या कंपूपुरता मर्यादित राहणारा आहे. कास धरण किंवा अन्य छोट्या-मोठ्या कामांचे श्रेय आमचे नेते खा. उदयनराजे भोसले यांनी स्वतःकडे न घेता सातारा नगरवासियांनाच वेळोवळी दिले आहे. तुम्ही उगाचच ऊर बडवून घेत आहात, असेही राजेशिर्के म्हणाले. तुम्ही 30-35 वर्षे नगरसेवक वगैरे आहात. परंतु यावेळच्या निवडणुकीत फक्‍त 37 मतांनी तुम्ही निवडून आला आहात. तुम्ही वॉर्डात चांगले काम केले असते, तर मोठ्या फरकाने निवडून आला असता, असा टोलाही राजेशिर्के यांनी मोने यांना लगावला आहे.