Mon, Jun 17, 2019 14:57होमपेज › Satara › पाहा उदयनराजे कोणाला म्‍हणाले 'आय लव...'

पाहा उदयनराजे कोणाला म्‍हणाले 'आय लव...'

Published On: Jan 06 2018 8:21PM | Last Updated: Jan 06 2018 8:59PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीने सभापती व विषय समित्यांच्या सदस्य निवडीत खांदेपालट केली आहे. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी नूतन पदाधिकार्‍यांना सभागृहात येऊन आपल्या शैलीत शुभेच्‍छा दिल्या. तसेच त्यांनी नगराध्यक्षांच्या दालनात सर्वांसोबत चर्चा करुन कामकाजाबाबत सूचना केल्या. 

या खांदेपालटात पाणीपुरवठा सभापतीपदी श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापतीपदी यशोधन नारकर, बांधकाम सभापतीपदी मनोज शेंडे, नियोजन समिती सभापतीपदी स्नेहा नलावडे, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता घोरपडे यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीमध्ये साविआने गटनेत्या स्मिता घोडके व अॅड. डी. जी. बनकर यांना तर नविआने शेखर मोरे-पाटील यांना संधी दिली.

सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सभापती व विषय समित्यांमधील सदस्य निवडींचा कार्यक्रम शनिवारी दुपारी पार पडला. मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे इच्छुक नगरसेवकांनी सभापती, विषय समिती सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया पार पडल्यावर पीठासीन अधिकारी तथा सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या विशेष सभेत सभापती व विषय समित्यांच्या सदस्यांनी नावे जाहीर करण्यात आली. 

श्रीकांत आंबेकर यांना पूर्वीचा पाणीपुरवठा विभागाचा अनुभव आहे. स्नेहा नलवडे यांनी बांधकाम तसेच महिला व बालकल्याण हे दोन्हीही विभागाचे कामकाज पाहिले आहे. दोन्हीही अनुभवी सभापती असले तरी त्यांना यशोधन नारकर, मनोज शेंडे, अनिता घोरपडे व संगीता आवळे यांना सर्वांना विश्वासात घेवून काम पहावे लागणार आहे. स्थायी समितीमध्ये साविआने स्मिता घोडके तसेच अॅड. बनकर यांना संधी दिली असून नगर विकास आघाडीने गोडोलीतील शेखर मोरे-पाटील यांना संधी देवून शह देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढील स्थायीच्या बैठका प्रचंड गाजण्याची चिन्हे आहेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक समारंभाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सुजाता राजेमहाडिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. निशांत पाटील पक्षप्रतोद म्हणून काम पाहणार आहेत.