Mon, Jul 22, 2019 04:42होमपेज › Satara › ‘लोकशाही नसती तर बलात्कार्‍याला गोळ्याच घातल्या असत्या’

राजेशाही आणा, मग मी दाखवतो : खा. उदयनराजे 

Published On: Apr 20 2018 8:07AM | Last Updated: Apr 20 2018 8:07AMसातारा : प्रतिनिधी

आज बलात्काराच्या घटना वाढत आहेत, याला अपवाद तुम्ही मान्य केलेली लोकशाही आहे. लोकशाही नसती तर बलात्कार्‍याला गोळ्या घातल्या असत्या. आता एकच करा पुन्हा राजेशाही आणा, मग मी दाखवतो काय करायचे, असे वक्तव्य खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

सातारा येथे आरोग्य कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू असून  या  आंदोलनस्थळी त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.  गुरूवारी सकाळी खा. उदयनराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देवून  कर्मचार्‍यांच्या न्याय मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तुम्ही जनतेने निवडून दिलेले सदस्य, लोकप्रतिनिधी जर तुमचे प्रश्‍न मार्गी लावत नसतील तर काय उपयोग? आरोग्य  विभागातील मशिनरी कर्मचारी नाहीत म्हणून सडून गेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत  कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात येणारे बेमुदत काम बंद आंदोलन  गुरूवारी चौथ्या दिवशीही सुरू होते. दरम्यान, आंदोलनस्थळी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी भेट देवून आरोग्य कर्मचार्‍यांच्या न्याय मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्य स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

आंदोलनकर्त्यांनी केलेल्या विविध घोषणाबाजीने जिल्हा परिषद कार्यालय परिसर दणाणून गेला होता.काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहेे.

दरम्यान, आंदोलनस्थळी आ. शिवेंद्रराजे भोसले, जि.प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर,  माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर,  अनिल देसाई, राजू भोसले,  संदिप शिंदे, जि.प. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काका पाटील, दत्ताजीराव बर्गे, जि.प.अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू शिंदे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट देवून शासन दरबारी मागण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.

Tags : Udayan Raje, Satara, Democracy, Issues, Rape, Case,