Fri, Jul 19, 2019 13:28होमपेज › Satara › खासदार उदयनराजेंकडून वाईचे मुख्याधिकारी धारेवर

खासदार उदयनराजेंकडून वाईचे मुख्याधिकारी धारेवर

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:14PMवाई : प्रतिनिधी

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी अचानक वाई नगरपालिकेला भेट देवून पालिकेच्या कामाचा आढावा घेतला. कृष्णा नदी सांडपाणी व्यवस्थापनावरून पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना त्यांनी जाब विचारात धारेवर धरले. 

दीड वर्षापूर्वी खा. उदयनराजे भोसले यांनी  वाईपासून नऊ किलोमीटर अंतरावरील धोम धरणाजवळील कृष्णा नदीच्या उगमापासून वाईपर्यंत कृष्णा नदीची पहाणी करून वाईच्या मुख्याधिकार्‍यांना बंदिस्त गटार योजना व सांडपाणी व्यवस्थापन या विषयांचा आराखडा तयार करण्यास सांगितला होता. तो पूर्ण न झाल्याने खा. उदयनराजेंनी मुख्याधिकार्‍यांना जाब विचारला.यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत आदी उपस्थित होते.           

तुम्हाला काम करावयाचे नसल्यास तसे सांगा, मला कामात हयगय चालत नाही, वाई नगरपालिकेत कोणाचीही सत्ता असूद्यात येथे कोणाचीही मक्तेदारी खपवून घेतली जाणार नाही, असे सुनावत खा. उदयनराजे यांनी  प्रशासनाने  विकासात राजकारण आणून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये. मी केलेल्या कामाचे श्रेय मला देवू नका, परंतु वेळकाढूपणा करून जनतेची दिशाभूल करू नका, पालिकेत कोणाची सत्ता आहे याला काही महत्व नसून मला फक्त वाई शहराचा विकास हवाय, विकासात श्रेयवादाचे राजकारण आणू नका, असा सज्जड इशाराही दिला.

यावेळी खासदार फंडातून सुचविलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. त्वरित अपूर्ण कामांचा प्रस्ताव तयार करून पाठवून देण्यास सांगितले. मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी पस्तीस कोटींचा कृष्णा नदी सांडपाणी व स्वच्छतेचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे सांगून तो अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे बाकी आहे, असे सांगताच खा. उदयनराजेंनी नगराध्यक्षांनी स्वतःचा अधिकार वापरून सर्वसाधारण सभेची वाट पहात न बसता कोणाचीही फिकीर न बाळगता जनतेचा विकास करावा, असे सांगितले. 

यावेळी खासदार फंडातून खा. उदयनराजेंनी वाई नगरपालिकेला दिलेल्या जेसीबीबाबत विचारणा करीत कृष्णा नदीच्या स्वच्छतेच्या कामाचे श्रेय दुसर्‍यांनी घेवू नये यासाठी पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने  जेसीबी स्वीकारला नसल्याचे निदर्शनास आणून दिले.