खेड : वार्ताहर
सातारा येथील वीज वितरण कंपनीच्या पोवई नाका शाखा नं 2 येथील दोन वायरमनना मंगळवारी विद्युत फिडरवरील हायव्होल्टेज वीज वाहिन्यांचा शॉक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. एकनाथ विठ्ठल शिंदे (वय 30, रा. दरे, ता. कोरेगाव) व महावीर भरत गुरव (वय 27, रा. सातारारोड ता. कोरेगाव) अशी जखमी वायरमनची नावे आहेत.
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास महामार्गानजीकच्या खेड हद्दीतील हॉटेल महिंद्र परिसरात वीज वितरण कंपनीची विद्युत खांबावरील दैनंदिन कामे सुरू होती. त्यावेळी शिंदे विद्युत खांबावर चढले होते व गुरव खाली उभे होते. यावेळी विजेच्या फिडरवरील एका हालव्होल्टेज वाहिनीचा विद्युत पुरवठा बंद होता, तर दुसर्या विद्युत वाहिनीचा वीज पुरवठा सुरू होता. विद्युत पुरवठा सुरू असलेल्या वाहिनीची केबल दोघांनी ओढून बांधताना त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. त्यामुळे शिंदे खांबावरून खाली कोसळले तर गुरव बाजुला फेकले गेले. अशा स्थितीत त्यांनी या घटनेची माहिती मोबाईलवरून पोवई नाका शाखेमधील अधिकारी व सहकार्यांना दिली. अधिकारी व सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा सर्वसाधारण रूग्णालयात आणले.
परंतु तेथे उपचार होवू न शकल्याने जखमींना खाजगी रूग्णालयात दाखल केले. जखमी वायरमन एकनाथ शिंदे यांच्या उजव्या हाताला, तोंडावर गंभीर दुखापत झाली असून हाताच्या बोटांचा रक्त पुरवठा बंद झाला आहे. ते सुमारे 16 टक्के भाजले असून उजव्या हाताच्या उपचारासाठी त्यांना पुणे येथील हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकार्यांनी दिला आहे. दुसरे जखमी वायरमन महावीर गुरव हे महावितरणच्या खाजगी ठेकेदार असलेल्या ठेकेदाराकडे ठेकेदारीवर काम करत आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून ते सुमारे 15 टक्के भाजून जखमी झाले आहेत. दोन्ही वायरमन मृत्यूच्या दाढेतून सुदैवाने परत आले आहेत. या घटनेने महावितरणच्या वायरमनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वायरमनमध्ये असुरक्षेचे वातावरण...
महावितरणच्या वायरमनचे जीवन असुरक्षित झाले असून जिल्ह्यात वर्षभरात सेवा बजावताना 3 वायरमन मृत्यूला सामोरे गेले आहेत तर सुमारे 10 ते 12 वायरमन जखमी होवून मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. याशिवाय महावितरणची विद्युत यंत्रणा जुनी झाल्याने वीजवाहिनी तुटून, खांब पडून शॉक लागल्याने जिल्ह्यातील सुमारे 10 ते 12 शेतकर्यांसह वायरमन मृत्यूमुखी पडले आहेत. काहीप्रसंगी निष्काळजीपणा असला तरी महावितरणची जुनाट यंत्रणाच तितकीच जबाबदार आहे. वायरमनना खांबावर चढण्यासाठी इन्सुलेटरची शिडी तसेच गाडीही नाही. सुरक्षिततेची कोणतीही साधने उपलब्ध नाहीत. शिवाय वायरमनच्या अनेक जागा रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या वायरमनवर ताण आहे.