Thu, Apr 25, 2019 11:43होमपेज › Satara › एसटीच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर

एसटीच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 18 2018 10:34PMकराड : प्रतिनिधी

ब्रेक फेल झाल्याने इंडीका कारसह दुचाकीला धडक देत एसटी बाजुच्या कंपाऊंडसह विद्युत खांबावर आदळली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कराड शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर गुरुवार दि. 18 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गारगोटी-कोल्हापूर-सातारा ही गारगोटी आगाराची एसटी कराड शहरातून बसस्थानकाकडे निघाली होती. शहरातील रहदारीच्या ‘पुढारी’ भवन चौकातून पुढे भेदा चौकाकडे एसटी जात असताना अचानक सुपरमार्केट चौकाजवळ एसटी ब्रेक फेल झाली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने पुढे असलेल्या इंडिका कारला एसटीने धडक दिली.

त्यानंतर रस्त्याकडेला पार्क केलेल्या दुचाकीला जोराची धडक देऊन एसटी विद्युत खांबावर जाऊन आदळली. नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरु असून खांबाचे कामही नव्याने करण्यात आले आहे. त्यामुळे त्यातून विद्युत प्रवाह सुरू नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, विद्युत खांब व एसटी यांच्यामध्ये अडकल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.

तर इंडिकाकारचेही नुकसान झाले आहे. अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.  अपघाताची माहिती मिळाताच स.पो.नि. प्रदीप खाटमोडे यांच्यासह वाहतूक शाखेचे व अपघात विभागाचे जाधव, इनामदार यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.