होमपेज › Satara › फलटण : बेजबाबदारपणा नडला, दोन पोलिस निलंबित

फलटण : बेजबाबदारपणा नडला, दोन पोलिस निलंबित

Published On: Jun 13 2018 6:31PM | Last Updated: Jun 13 2018 11:00PM



सातारा : प्रतिनिधी

फलटण शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदारांवर कर्तव्यपूर्ती, बेशिस्त व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना निलंबित केले आहे. किशोर हणमंत गिरी व नितीन दिलीप चतुरे अशी निलंबित केलेल्या दोन्ही पोलिसांची नावे आहेत. दरम्यान, एका पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवर कारवाई झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस हवालदार किशोर गिरी हे मलटण बीटमध्ये कर्तव्य बजावत आहेत, तर नितीन चतुरे हे गुन्हे तपास पथकात काम करत आहेत. मलटण बीट व फलटण शहरात अवैध धंदे सुरु आहेत. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रार केल्या आहेत. याशिवाय अरुण उर्फ गब्बर माणिक जाधव हा तडीपार असतानाही तो अपरात्री येवून नागरिकांना दमदाटी करत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे अवैध सुरु असलेले धंदे व तडीपारीतील संशयितांचा बिनधोकपणे सुरु असलेला वावर या गंभीर बाबी समोर आल्या.

या सर्व बाबींचा दोन्ही पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांना बुधवारी पोलिस अधीक्षक यांनी निलंबीत केले. निलंबनाच्या कारवाईनंतर दोन्ही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत या दोन्ही पोलिसांचे मुख्यालय ढेबेवाडी देण्यात आले आहे. दरम्यान, अशाप्रकारे बेशिस्त वागणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.