Wed, Jul 24, 2019 14:12होमपेज › Satara › महामार्गावर दोघा पोलिस कर्मचार्‍यांना लुटले 

महामार्गावर दोघा पोलिस कर्मचार्‍यांना लुटले 

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 11:21PMउंब्रज : प्रतिनिधी 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेरले (ता. कराड) हद्दीत पेरले फाटा येथे कोल्हापूर येथील पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील कामकाज आटोपून मोटारसायकलवरून परत येणार्‍या सातारा मुख्यालयातील व पुणे ग्रामीण मुख्यालयातील दोघा पोलिस कर्मचार्‍यांना कार आडवी मारून चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शासकीय कागदपत्रे, सेवा पुस्तके आणि रोख रक्‍कम लुटल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री घडली. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी अवघ्या पाच तासांत संशयितांना मुद्देमालासह जेरबंद केले. दरम्यान, त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

प्रतीक प्रकाश माने (रा. काशिळ), अशोक शिवाजी पवार, सागर मारुती देशमुख आणि गणेश संजय जाधव (सर्व रा. पाल, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. तर पो.कॉ. विजय दत्तात्रय घाटगे (वय 30) पोलिस मुख्यालय सातारा आणि पो.कॉ. बापूराव म्हेत्रे पुणे ग्रामीण पोलिस     मुख्यालय अशी मारहाण झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांची  नावे आहेत. 

याबाबत विजय घाटगे यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार घाटगे हे मंगळवार दि. 24 एप्रिल रोजी दुपारी 2 च्या सुमारास पोलिस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापूर परीक्षेत्राचे टपाल पोच करण्यासाठी गेले होते. सदरचे टपाल देवून त्यांनी सातारा कार्यालयासाठीचे टपाल आणि सेवापुस्तके ताब्यात घेतली. या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाचे पो.कॉ. बापूराव म्हेत्रे यांची भेट झाली. त्यांनीही टपाल देवून पुणे ग्रामीण मुख्यालयाचे टपाल आणि सेवापुस्तके ताब्यात घेतली. घाटगे हे म्हेत्रे यांची मोटारसायकल एमएच-09-डीई-6522 वरून कोल्हापूर येथून सायंकाळी सातच्या सुमारास निघाले. 

रात्री 9.30 वा.च्या सुमारास पेरले ता.कराड गावच्या हद्दीत पाठीमागून ओव्हरटेक करून कार (एमएच-15-जीए-1522) समोर उभी राहिली. कार मधील दोघेजण उतरून त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांना दमदाटी करून मारहाण करण्यास सुरूवात केली.  एकाने मोबाईलवर फोन करून अन्य दोघांना बोलावून घेतले. काहीवेळात बिगर नंबरच्या बुलेटवरून दोनजण घटनास्थळी आले. यावेळी कार मधील दोघांनी मोटार सायकलवरील सेवा पुस्तकांची दोन गाठोडी जबरदस्तीने हिसकावून घेवून कार मध्ये ठेवली. तसेच म्हेत्रे यांच्या पाठीला अडकविलेली सॅक हिसकावून पलायन केले. यामध्ये रोख रक्‍कम, पॅनकार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे होती. तर दोन गाठोडयामध्ये सातारा पोलिस दलाची 15 आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाची 10 सेवापुस्तके होती.

दरम्यान सदर घटनेची माहिती घाटगे यांनी सातारा पोलिस कंट्रोलला देताच घटनास्थळी उंब्रज पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बजरंग कापसे व त्यांचे सहकारी यांनी तातडीने धाव घेतली. कार नंबरवरून संशयीतांचा शोध घेत अवघ्या पाच तासात संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सेवा पुस्तके हस्तगत करण्यात आली आहेत. अधिक तपास स.पो.नि. कापसे करत आहेत.