Wed, May 22, 2019 07:24होमपेज › Satara › आयनॉक्स युनिव्हर्सिटीप्रकरणी आणखी दोघांना अटक

आयनॉक्स युनिव्हर्सिटीप्रकरणी आणखी दोघांना अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोरेगाव : प्रतिनिधी

ऑनलाईन आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा कारभार करणार्‍या विठ्ठल मदने याने आपल्या सामाजिक कार्याची व्याप्ती देखील चांगलीच वाढवली असल्याचे पोलिस तपासात उजेडात येत आहे. त्याने मानवाधिकार संघटनेची देखील स्थापना केली असल्याचे दिसून येत असून या कामामध्ये त्याला मदत करणारे दोन साथीदार पोलिसांना सापडले आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

ऑनलाईन आयनॉक्स इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीबाबत पुणे येथील आरटीआय कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास व विकास कुचेकर याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर मदने याने आजवर केलेल्या कारनाम्यांची माहिती देण्यास सुरुवात केली असून, त्याच्या कामाची व्याप्ती मोठी असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे. एक नव्हे तर अनेक संस्थांची स्थापना त्याने केलेली असून, त्याद्वारे अनेक लोकांना आपल्या प्रवाहात सहभागी करुन घेतले आहे. त्यासाठी त्याने पध्दतशीरपणे शुल्क आकारले आहे. 

मदने याने 2006 साली ह्युमन राईट्स जस्टीस फेडरेशन स्थापन केले असून या फेडरेशनद्वारे काम करणार्‍या धारपुडी, ता. खटाव येथील सदानंद यशवंत जगताप (वय 57) व मांडा-टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे येथील भरतकुमार करण सोनार (वय 34) यांना पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा व सहायक फौजदार वसंत साबळे यांनी अटक केली. तिघांनी सातारा जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील अनेकांना नाममात्र शुल्क घेऊन या ह्युमन राईट्स संघटनेची ओळखपत्रे दिलेली आहेत. मदने याच्याबरोबर त्यांचा वावर असल्याचे उजेडात आले आहे. 

अटकेत असलेल्या विठ्ठल मदने याच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्याच्यासह सदानंद जगताप व भरतकुमार सोनार याला सहायक फौजदार वसंत साबळे यांनी न्यायालयात न्या. एम. ए. शिलार यांच्यासमोर हजर केले. न्या. शिलार यांनी तिघांना दि. 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

पोलिसांबरोबर विठ्ठल मदने याने पाहिला सातारा

एरव्ही दुचाकीवरुन जॅकेट घालून ऐटित सातारा शहरात रपेट मारणार्‍या विठ्ठल मदने याला शुक्रवारी पोलिसांबरोबर साध्या टी-शर्ट आणि नाईट पँटमध्ये  सातारा शहर पहावे लागले. ज्या ठिकाणी आणि ज्यांच्या मदतीने तो पदवीदान कार्यक्रम घ्यायचा, अशांसमोर त्याला पोलिसांबरोबर जावे लागले. पोलिसांनी त्याच्या प्रत्येक घटनेची बारकाईने माहिती घेतली असून, संबंधितांचे जाबजबाब नोंद केले आहेत. ज्या हॉटेल्समध्ये तो रुबाबात ऑर्डर सोडत होता, त्याच हॉटेलच्या काऊंटरवर तो मूग गिळून उभा राहिल्याचे पाहून हॉटेलचे कर्मचारी देखील बुचकळ्यात पडले होते. 

 

Tags : satara, Koregaon news, crime, Ainox university case, Two arrested,


  •