Sat, Aug 24, 2019 23:16



होमपेज › Satara › साताऱ्यातील दोन आमदार भाजपाच्या संपर्कात

साताऱ्यातील दोन आमदार भाजपाच्या संपर्कात

Published On: Mar 09 2018 2:38PM | Last Updated: Mar 09 2018 2:38PM



कराड : प्रतिनिधी
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच काही मतदारसंघांच्या रचनेत बदल होऊ शकतो. त्यामुळे भाजपाने स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केल्याचे सांगत सातारा जिल्ह्यातील दोन आमदार भाजपमधील रिष्ठांच्या संपर्कात आहेत, असे सांगत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी खळबळ उडवून दिली आहे.

कराडमधील शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत पावसकर यांनी ही माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत सुमारे साडेतीन लाख मते मिळण्याबाबत आमची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र लोकसभेचा उमेदवार कोण असेल ? याबाबत भाष्य करताना उमेदवाराबाबत पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत आत्तापासूनच लोकांमध्ये चर्चा सुरू असल्याकडे लक्ष वेधले असता पावसकर यांनी अजूनही काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे याबाबत आत्ताच कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही पावसकर यांनी सांगितले.

तसेच विधानसभा निवडणुकीबाबत जिल्ह्यातील कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव आणि सातारा या चार मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी करण्यासाठी कार्येकर्ते आत्तापासूनच कामाला लागले आहेत. त्याचबरोबर दोन विद्यमान आमदार संपर्कात असून नोव्हेंबर 2018 मध्ये याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होतील, असे सूतोवाचही पावसकर यांनी केले आहे.