Mon, Jun 24, 2019 21:59होमपेज › Satara › एस.टी.-दुचाकी अपघातात दोन अल्पवयीन मुली ठार

एस.टी.-दुचाकी अपघातात दोन अल्पवयीन मुली ठार

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:43PMमसूर : वार्ताहर

लग्नकार्याचे देवदर्शन आटोपून परतत असताना शामगाव घाटातील पोलिस चेक नाक्यासमोरील वळणावर एस. टी. व मोटारसायकल यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. बुधवार दि. 16 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कु. भूमी प्रकाश तुपे (वय 12), कु. संचिता विजय तुपे (वय 10,  सध्या रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या मुलींची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शामगावहून लग्नकार्याचे देवदर्शन आटोपून दुचाकी (क्र. एम.एच.05 एए 4377) वरून दुचाकीचालक प्रशांत बाळासाहेब थोरात (मूळ गाव सवादे, ता. कराड) व त्याच्या मामाच्या दोन मुली कु.भूमी तुपे व कु. संचिता तुपे या प्रशांतच्या मावसभावाचे 19 मे रोजी होणार्‍या लग्नकार्याच्या देवदर्शनासाठी आले होते. ते आटोपून कोपर्डेला परतत होते. त्याचवेळी वडूज डेपोची कराड-वडूज एस. टी. (क्र.एम.एच.06 एस 8057) ही वडूजकडे जात असताना शामगाव घाटातील पोलिस चेकनाक्यासमोरील वळणावर एस.टी.च्या पाठीमागील बाजूस मोटरसायकलची जोरदार धडक बसली. यामध्ये मोटरसायकल चालक प्रशांत बाजुला पडला तर दोघी मुलींचे डोके एस.टी.च्या पाठीमागील बाजूस जोराने आपटले. त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, जखमींचे नातेवाईक पाठीमागून कारमधून येत होते. त्यांनी तातडीने कारमधून जखमींना कराडला खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. 

अपघातात प्रशांत यांच्या पायाला मार लागला आहे. तर दोन्ही मुलींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यापैकी कु.भूमी तुपे व संचिता तुपे हिचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची खबर प्रशांत थोरात यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिली असून एस.टी.चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि.बजरंग कापसे करत आहेत. 

वळणावर सावधानता फलक आवश्यक..

शामगाव घाट सुरू होताना व त्यानंतर पुढे मंदिराच्या पाठीमागे धोकादायक वळणे आहेत. त्याठिकाणी नेहमीच वाहनांचे अपघात होतात. अनेकांना आपल्या प्राणाला त्याठिकाणी मुकावे लागले आहे. संबंधितांनी या वळणावर डिव्हायडर अथवा सावधानता फलक लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे वाहनधारकांनी सांगितले. दरम्यान, पुसेसावळीहून येताना शामगाव घाट सुरू होतो. तेथेही दोन रस्ते एकत्र आल्याने दोन्हीकडील वाहनधारकांना वेगाचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. तेथेही पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.