Wed, Jul 17, 2019 20:38होमपेज › Satara › दोन लाखात इनोव्हा घेऊन फसवणूक

दोन लाखात इनोव्हा घेऊन फसवणूक

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:37PMसातारा : प्रतिनिधी

टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायिकाबरोबर इनोव्हा कार विक्रीची चर्चा झाल्यानंतर 7 लाख 10 हजार रुपयांच्या व्यवहारापैकी केवळ 2 लाख 10 हजार रुपये देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संशयितांपैकी एकजण ओझर्डे तर दोघेजण मायणी येथील आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत ही कारवाई करून इनोव्हा कारही जप्त केली आहे.

समीर अब्दुलगणी इनामदार (वय 33, रा. ओझर्डे ता. वाई), सर्जेराव नामदेव पाटोळे (वय 43) व सचिन सदाशिव देशमुख (वय 34, दोघे रा. मायणी ता. खटाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय महादेव तोडकर (वय 31, रा. करंजे पेठ, सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार दत्तात्रय तोडकर यांची स्वत:ची इनोव्हा गाडी (क्रमांक एम.एच. 11 एके 7547) आहे. ती विकायची होती. संशयित समीर इनामदार याने इनोव्हा विकत घेण्यासाठी संपर्क साधला होता. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर इनोव्हा कारचा 7 लाख 10 हजार रुपयांचा व्यवहार ठरला. संशयित समीर याने दत्तात्रय तोडकर यांना त्याबदल्यात तीन टप्प्यात 2 लाख 10 हजार रुपयेही दिले.

दि. 7 फेब्रुवारी रोजी संशयित समीर इनामदार हा दत्तात्रय तोडकर यांच्या घरी गेला व त्याने इनोव्हा कार घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तोडकर यांनी व्यवहार अपूर्ण असून अद्याप 5 लाख मिळाले नसल्याचे सांगितले. त्यावर इनोव्हा कुटुंबियांना दाखवून आणतो, असे सांगून कारची किल्ली घेतली. कार घेवून गेल्यानंतर बराच वेळ झाला तरी समीर त्या दिवसभरात परत आलाच नाही. या दिवशी तोडकर यांनी त्यांना वारंवार फोनही केला मात्र संशयिताने प्रतिसाद दिला नाही.

दुसर्‍या दिवशी फोनवरुन बोलणे झाल्यानंतर संशयित समीर याने बँकेचे चेक देतो, असे सांगून दोन चेक दिले. मात्र ते दोन्ही चेक बँकेत वटले नाहीत. तक्रारदार दत्तात्रय तोडकर यांनी पुन्हा समीर याला फोन करुन चेकबाबत विचारले असता त्याने रोख रक्कम देतो, असे सांगून पुन्हा वेळ मागितली.  मात्र त्याने पैसे दिलेच नाहीत. अखेर 7 लाख 10 हजार रुपयांची इनोव्हा कार केवळ 2 लाख 10 हजार रुपयांना घेवून 5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तक्रारदार दत्तात्रय तोडकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.

दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. बुधवारी तपासाची चक्रे गतीमान केली असता इतर दोन संशयितांचीही नावे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी याप्ररणात तीन संशयितांना अटक केली. या करवाईनंतर पोलिसांनी ती इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, गाड्या विक्रीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असून पोलिस त्या दिशेनेही तपास करत आहे.पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर धुमाळ, पोलिस हवालदार किशोर जाधव, प्रवीण गोरे, अमित माने, मोहन पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.