Wed, Apr 24, 2019 11:49होमपेज › Satara › तरडगावजवळ अपघातात २ ठार

तरडगावजवळ अपघातात २ ठार

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:46PMलोणंद : प्रतिनिधी

लोणंद-फलटण रस्त्यावर तरडगावच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाच्या कठड्याला सोमवारी मध्यरात्री स्विफ्ट  कार धडकून झालेल्या अपघातात दोघे जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. मृत पाडेगाव व मांडकी येथील असून बुध, डिस्कळ येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीवरून परत येताना हा अपघात झाला. जखमींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पाडेगाव व मांडकी येथील धुमाळ, देसाई कुटुंबीय नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी स्वीप्ट कारने (एमएच - 12 एचझेड-7727) बुध डिस्कळ येथे गेले होते.

तेथून येताना त्यांची गाडी लोणंद-फलटण रस्त्यावर तरडगावच्या हद्दीत पालखी तळाजवळील भोवर नावच्या ओढ्याच्या पुलावर आली असता पुलाच्या कठड्याला कारची धडक बसली. अपघात इतका भीषण होता की स्वीप्ट कारच्या पुढील बाजुचा चक्काचूर झाला तर कारमधील सर्वच पाचजणांना गंभीर दुखापत झाली होती.  त्यापैकी पुरंदर ना. सह. पतसंस्थेचे निरा शाखा प्रमुख संजय शिवाजी धुमाळ वय 43 रा. मांडकी, ता. पुरंदर आणि  शोभा नंदकुमार धुमाळ वय 45 रा. पाडेगाव, ता. फलटण हे दोघे ठार झाले. संजय धुमाळ हे गाडी चालवत होते. त्यांच्या  पत्नी सारीका संजय धुमाळ यांच्या हातापायांना फ्रॅक्‍चर होऊन त्याही गंभीर झाल्या. त्यांच्यासह कमल दगडू धुमाळ, विजय देसाई रा. पाडेगाव फार्म असे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात सपोनि लांडे, हवालदार डी. डी. पवार, एल. बी. डोंबाळे, तुकाराम सावंत यांनी धाव घेतली. संजय धुमाळ यांच्या मृत्युची माहिती मिळताच लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांनी शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार  करण्यात आले. अपघाताची खबर सचिन देसाई रा. पाडेगाव फार्म यांनी लोणंद पोलिसात दिली आहे. 

 

Tags : satara, satara news, Taradgaon, accident,