Sat, Feb 16, 2019 21:07होमपेज › Satara › सातार्‍याजवळ दोन अपघातांत दोन ठार 

सातार्‍याजवळ दोन अपघातांत दोन ठार 

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 10:56PMसातारा : प्रतिनिधी

सातारा तालुक्यातील नेले येथे टेम्पोने ठोकरल्याने झालेल्या अपघातात बालिका ठार झाली, तर शेंद्रे येथे महामार्गावर पोलिस व्हॅन व दुचाकी यांच्या अपघातात युवक ठार झाला. दोन्ही अपघातांची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

नेले येथे जान्हवी संतोष धोत्रे (वय 6 रा. नेले) हिला बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातील बसस्टॉपजवळ किडगाव येथून वर्येकडे निघालेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात जान्हवी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर पसार होवू पाहणार्‍या टेम्पोचा ग्रामस्थांनी पाठलाग करून अडवला व चालकास चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून टेम्पोचालक विशाल रामचंद्र लोहार (रा. करंजे, सातारा) याला अटक झाली आहे. तपास उपनिरीक्षक स्वराज पाटील करत आहेत.

शेंद्रे येथे रात्री 12 च्या सुमारास झालेल्या गस्त घालणारी पोलिस व्हॅन लेन बदलत असतानाच पाठीमागून आलेली दुचाकी व्हॅनला धडकली. या अपघातात दुचाकीवरील भक्तवडी, ता. कोरेगाव येथील विकी महेंद्र वाघमारे आणि पाठीमागील युवक हे दोघे जखमी झाले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वाघमारे यांना मृत घोषित करण्यात आले तर दुसर्‍या जखमीवर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्याद पोलीस कर्मचारी राहुल गायकवाड यांनी तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली असून तपास हवालदार गभाले,  मोरे, संदीप पाटील करत आहेत.