Fri, Jul 19, 2019 22:23होमपेज › Satara › दोन लाखांचे सावकारी व्याज ५६ लाख

दोन लाखांचे सावकारी व्याज ५६ लाख

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:52PMकराड : प्रतिनिधी

वैद्यकीय उपचारासाठी उसणे दिलेल्या दोन लाख रुपयांना व्याज व त्या व्याजाला दंड व्याज आकारणी करत वर्षभरात 56 लाख 65 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ती रक्कम न दिल्यास सर्व मालमत्ता ताब्यात घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोयना वसाहत (ता. कराड) येथील सुरेश तुकाराम निकम याच्यावर सावकारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कोयना वसाहत येथील रहिवाशी व येणके (ता. कराड) येथील ग्रामसेवक महादेव आबा माने यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

याबाबत पोलिसांनी सांगितले की, महादेव माने व सुरेश निकम हे कोयना वसाहत (मलकापूर) येथे गुरुकृपा बिल्डिंग या एकाच इमारतीमध्ये राहतात. त्यामुळे त्यांची चांगली ओळख आहे. महादेव माने हे येणके येथे ग्रामसेवक म्हणून नोकरी करत असून ते आजारी असल्याने त्यांनी रजा काढली होती. दरम्यान, माने आजारी असल्याचे समजल्यानंतर त्यांना बघण्यासाठी म्हणून निकम त्यांच्या घरी गेला. परिस्थिती नसल्याने माने यांच्यावर उपचार करता येत नसल्याचे समजल्याने निकम याने माने यांना दोन लाख रुपयउपचारासाठी दिले. यावेळी त्याने एक मित्र व धाकटा भाऊ असे समजून हे पैसे देत असल्याचेही माने यांना सांगितले होते. त्यावेळी हे पैसे मला लवकर परत करता येणार नाहीत, असे माने यांनी सांगितल्यानंतर पुर्ण बरा झाल्यानंतर पैसे द्या, असे सांगून निकम तेथून निघून गेला होता. 

त्यानंतर सुमारे महिनाभराने म्हणजेच 17 मार्च 2017 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुरेश निकम हा महादेव माने यांच्या घरी गेला. मी मुळ रकमेच्या 10 टक्के दराने मासिक व्याज घेतो. त्याप्रमाणे तुमचे व्याज 20 हजार व त्याच तारखेला पैसे दिले नाहीत तर दुसर्‍या दिवशी पहिल्या दंड व्याजाच्या 50 टक्के रक्कम घेतो. त्यावेळीही पैसे दिले नाहीत तर त्यावरही व्याज लावतो असे सांगून मुद्दल, व्याज व पुन्हा व्याजावर व्याज असे पैसे घेतो. 

त्यामुळे तुम्हाला नियमाप्रमाणे व्याज व व्याजावर व्याज असे पैसे द्यावे लागतील, असे निकम याने माने यांना सांगितले होते. त्यावेळी माने यांनी निकमकडे खासगी सावकारीच्या परवान्याबाबत विचारले असता निकम याने नसल्याचे सांगितले होते, असेही पोलिसांनी सांगितले. 

त्यानंतर सुरेश निकम हा प्रत्येक महिन्याच्या 11 ते 12 तारखेला महादेव माने यांच्या घरी जाऊन पैसे मागू लागला. प्रत्येकवेळी सर्व पैसे मिळत नसल्याने व व्याजाची रक्कम वाढत असल्याचे लक्षात येताच निकम याने माने यांना तुम्हाला तुमची सगळी मालमत्ता विकावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे माने याने कर्ज काढून बँक खात्यावरील चेकव्दारे निकम याला सुमारे तीन लाख रुपये दिले आहेत. त्यानंतरही सुरेश निकम हा महादेव माने यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी करू लागला. त्यावेळी माने यांनी मी तुम्हाला चार महिन्याचे 5 लाख 47 हजार रुपये दिले आहेत, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही अजून पैसे येणे बाकी असल्याचे सांगत सुरेश निकम हा महादेव माने यांना दमदाटी करू लागला. दि. 16 एप्रिल 2018 रोजी तर निकम याने येणके येथे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन माने यांना ‘तु मला व्याजासह 56 लाख 65 हजार रुपये देणे बाकी आहे. ते मला चार महिन्याच्या आत दिले नाहीस तर तुमची सर्व मालमत्ता ताब्यात घेईन. बायका मुलांचा विचार कर नाहीतर अनर्थ होईल’, अशी धमकी दिली. 

त्यामुळे सुरेश निकम याच्याकडून वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून महादेव माने यांनी शुक्रवार दि. 20 रोजी उशीरा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन सुरेश निकम याच्यावर सावकारी कायद्यांनर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद कांबळे करत आहेत. 

 

Tags : satara, Karad news, crime, interest, money lending,