Thu, Jun 27, 2019 09:37होमपेज › Satara ›  कराड : दोन धारकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

 कराड : दोन धारकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Published On: Feb 15 2018 10:49PM | Last Updated: Feb 15 2018 10:49PMकराड : प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठानच्या दोन युवा धारकऱ्यांचा गुरूवारी रात्री सैदापूर (ता. कराड) येथे वीज वाहक खांबाला स्पर्श झाल्‍याने विजेच्या धक्‍याने  मृत्यू झाला. आकाश मोहन ढवळे (वय २५, बुधवार पेठ कराड) आणि ओंकार उत्तमराव माने (वय ३0 रा. शुक्रवार पेठ कराड) अशी मृतांची नावे आहेत. वीजेचा धक्‍का बसल्‍यानंतर ढवळे व माने या दोघांना येथील कृष्णा रूग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद रात्री शहर पोलिस ठाण्यात झाली.

पोलिसांकडील व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान या संघटनेचे येथील धारकरी असलेले आकाश ढवळे व ओंकार माने हे दोघेजण गुरूवारी रात्री काही कामानिमित्त सैदापूर येथे गेले होते. तेथे रस्त्याकडेला असलेल्या एका विजेच्या खांबावर वीज प्रवाह उतरल्याची त्यांना कल्पना नव्हती. या खांबाचा स्पर्श झाल्याने दोघांना विजेचा धक्का बसला. ही घटना पाहणाऱ्यांनी पाहिल्‍यानंतर दोघांना तातडीने येथील कृष्णा रूग्णालयात हलवले. मात्र, तेथील डॉक्टरांनी दोघांचा वाटेतच मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. 

दरम्यान, दोन धारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने सैदापूर येथील घटनास्थळी व कृष्णा रूग्णालयात आले होते. या घटनेने धारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.