Mon, Nov 19, 2018 17:03होमपेज › Satara › तहसील कार्यालयातील  दोन कर्मचार्‍यांना मारहाण

तहसील कार्यालयातील  दोन कर्मचार्‍यांना मारहाण

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:43PMतासवडे टोलनाका ः वार्ताहर 

वाळू वाहतूक करणारा डंपर कराड तहसील कार्यालयात नेण्यास सांगितल्याने कराड तहसील कार्यालयातील दोघा कर्मचार्‍यांना चौघांनी जबर मारहाण केली आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कराड) गावच्या हद्दीत ही धक्‍कादायक घटना घडली आहे. 

गौण खनिज विभागाचे अव्वल कारकून मकरंद साळुंखे व लिपिक संतोष गुलानी अशी मारहाण झालेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. कराड तालुक्यातील बेकायदा वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी एका भरारी पथकाची स्थापना केली आहे. या पथकात साळुंखे व गुलानी यांचा समावेश असून सोमवारी ते महामार्गावर गस्त घालत होते. इंदोली फाटा परिसरात सातारा बाजूकडून कराडच्या दिशेने वाळूने भरलेला एक डंपर येत होता. 

या डंपर चालकाला थांबण्यास सांगत वाळूबाबतची माहिती त्या दोघांनी विचारली. मात्र समाधानकारक उत्तर देता न आल्याने साळुंखे व गुलानी यांनी चालकाला डंपर कराड तहसील कार्यालयात नेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर चालकाने महामार्गावरून डंपर वहागावपर्यंत आणला आणि नंतर तो अचानकपणे सर्व्हिस रस्त्यावरून पुन्हा उंब्रजच्या दिशेने नेण्यास सुरूवात केली. यावेळी साळुंखे व गुलानी हे शासकीय जीपमधून डंपरचा पाठलाग करत होते. 

जीपमधून पाठलाग करत बेलवडे हवेली गावच्या हद्दीत त्या दोघांनी पुन्हा डंपर पकडला. त्याचवेळी अचानकपणे डंपर चालकासह बुलेटवरून आलेल्या तिघांनी साळुंखे व गुलानी यांच्यावर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी त्या दोघांना मारहाण केली. दरम्यानच्या कालावधीत कराड तहसील कार्यालयाची दुसरी गाडी त्याठिकाणी पोहचली. यातून निवासी नायब तहसिलदार अजित कुराडे यांच्यासह त्यांचे सहकारी खाली उतरल्याचे पाहून मारहाण करणार्‍या संशयितांनी बुलेट जागेवर सोडून डंपरमधून बेलवडे हवेलीकडे पलायन केले. त्यानंतर ज्या डंपरमधून संशयितांनी पळ काढला, तो डंपर बेलवडे हवेली गावात बेवारस स्थितीत सोडून दिल्याचे आढळला. दरम्यान, याप्रकरणी तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. तसेच संशयितांची नावे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकली नव्हती.