Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Satara › कराडात दोन एजंट गजाआड

कराडात दोन एजंट गजाआड

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 1:21AMकराड : प्रतिनिधी 

तत्कालीन रोखपालांनी आरटीओ कार्यालयात आलेली 1600 पुस्तके वाहनातून उतरून घेण्यासाठी घेतलेल्या मदतीवेळीच दोघा एजंटांनी पुस्तके चोरण्याची योजना आखली होती, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. शैलेंद्र सदानंद नकाते (वय 29, मंगळवार पेठ, कराड) आणि प्रवीण प्रल्हाद साळुंखे (वय 31, रा. कोडोली, ता. कराड) अशी त्या दोघांची नावे असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी काही संशयित एजंटांची नावे समोर आली आहेत.

कराडच्या आरटीओ कार्यालयासाठी एका वाहनातून 1600 पावती पुस्तके  आणण्यात आली होती. मात्र रोखपालांना ते एकट्याला उतरवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यावेळी शैलेंद्र नकाते आणि प्रविण साळुंंखे उर्फ पप्पू परीट या दोघांची मदत पुस्तके उतरवण्यासाठी घेण्यात आली होती. मात्र, त्या दोघांनी रोखपाल यांचा विश्‍वासघात करत पुस्तके लंपास करण्याची योजना आखली. तसेच ज्या रूममध्ये पुस्तके ठेवली होती, त्या रूमची खिडकी लॉक न करता कोणाचे लक्ष नसताना ती उघडून पुस्तके लंपास करण्याचा नकाते व साळुंखे याचा डाव होता.

पुस्तके ठेऊन झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी लॉक न केलेल्या खिडकीतून नकाते याने गायब झालेली पुस्तके चोरली होती. विशेष म्हणजे यावेळी कोणी पहात नाही ना? यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी साळुंंखे याने पार पाडली होती. पुस्तके चोरल्यानंतर साळुंखे व नकाते या दोघांनीही पुस्तके चोरल्याची माहिती अन्य सहकारी एजटांना दिली होती. त्यामुळे अन्य एजंट गरज भासेल, त्यावेळी चोरलेल्या पावती पुस्तकातील पावत्यांचा वापर करत होते, अशी माहिती नकाते व साळुंखे यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीतून समोर आली आहे.  

दरम्यान, एजंट चालकांना कसा गंडा घालत होते आणि कशाप्रकारे एजंटाकडून वाहन धारकांची लूट केली जात होती? याबाबतची महत्त्वपूर्ण माहितीही चौकशीतून समोर आली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍याचा निष्काळजीपणाही समोर आला असून खासगी लोकांची मदत पुस्तक उतवरण्यासाठी घेणे योग्य होते का? याबाबतही आता संभ्रम निर्माण झाला आहे.