Wed, May 22, 2019 16:16होमपेज › Satara › यात्रेचं जेवण जीवावर बेतलं, अपघातात दोघांचा मृत्यू

यात्रेचं जेवण जीवावर बेतलं, अपघातात दोघांचा मृत्यू

Published On: Apr 21 2018 2:45PM | Last Updated: Apr 21 2018 10:17PMवाई : प्रतिनिधी

सर्जापूर कळंभे, ता. वाई येथे  यात्रा करून घरी परतत असताना दुचाकी व कारच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाला. वाई-पाचवड रस्त्यावर भीमनगर तिकाटण्याजवळ  शुक्रवारी रात्री 11.30 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

या अपघातात तिसरा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शुभम प्रवीण महिद्रे (वय 21, रा. गंगापुरी, वाई), अक्षय रघुनाथ चिकणे (22, रा. चिकणेवाडी, भुईंज) अशी ठार झालेल्या जीवलग मित्रांची नावे आहेत. पंकज सुनील चव्हाण (21, रा. नावेचीवाडी, ता. वाई) हा गंभीर जखमी आहे. 

हे तिघे मित्र दुचाकीवरून सर्जापूर  कळंभे येथे मित्राच्या घरी यात्रेचे जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री 11 वाजता जेवण करून ते वाईकडे येत असताना  वाई-पाचवड रस्त्यावर भिमनगर तिकाटण्याजवळ  आले असताना पाचवडकडे जाणारी कार (क्र. एमएच 05 एजे 6838) व दुचाकी (क्र. एमएच 11 बीएफ 3252) यांची जोरदार धडक झाली. या अपघातात शुभम व अक्षय हे जागीच ठार झाले. तर पंकज चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे. 

याप्रकरणी कार चालक विनोद बबन अडागळे रा. घाटकोपर, मुंबई याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाई पोलिस ठाण्यातील सपोनि पी. एस. कदम करत आहेत.

अक्षय आयुष्याच्या परीक्षेत नापास

शुभम महिद्रे हा पुण्यातील टेल्को सर्व्हिसमध्ये नोकरीस होता. तर अक्षय हा वाई येथील एका महाविद्यालयात बी. ए. च्या दुसर्‍या वर्षात शिकत होता. अक्षयने गुरुवारीच परिक्षेचा पेपर दिला होता. त्याचे अजून 4 पेपर बाकी होते. त्यापूर्वीच अक्षय आयुष्याच्या परीक्षेत मात्र नापास झाला. शुभम व अक्षयच्या मृत्यूने हळहळ व्यक्‍त होत असून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.