होमपेज › Satara › कराडः वाघ नखांची तस्करी; दोघांवर कारवाई

कराडः वाघ नखांची तस्करी; दोघांवर कारवाई

Published On: Sep 08 2018 2:59PM | Last Updated: Sep 09 2018 12:26AMकराड : प्रतिनिधी

वाघ नखांची तस्करी करणार्‍या अल्पवयीन मुलासह दोघांवर पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. एकाला अटक केली असून त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे शुक्रवार, दि. 7 रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दोन वाघ नखे, दोन चाकू व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.  अवधूत जगदीश जगताप (वय 18, रा. खुबी ता. कराड) असे पोलीस कोठडी मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, डीवायएसपी नवनाथ ढवळे यांना खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार वडगाव हवेली येथे पेट्रोल पंपजवळ जंगली प्राण्यांच्या वाघ नखे विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डीवायएसपी ढवळे यांनी पोलीस उपनिरीक्षक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी वडगाव हवेली येथे इसार पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून दोन तरुण तेथे आले. रस्त्याकडेला इसार पेट्रोल पंपाजवळ ते उभे राहिले असता त्या तरुणांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्याजवळ जाऊन चौकशी केली. तसेच खात्री करण्यासाठी प्राण्यांच्या नखांबाबत डील करण्यास सुरुवात केली. त्यानुसार 17 हजार रुपयांना दोन वाघ नखे यावर त्यांचा सौदा फायनल झाला. त्यानंतर पोलिसांनी संशयितांजवळील वाघ नखे घेतले व पैसे देण्याचा बहाणा करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी संशयितांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना बाजूलाच झुडपाजवळ पकडले. दोन पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन धारदार चाकू आढळून आले. तसेच ज्या मोटरसायकलवरून ते आले होते ती मोटरसायकल, दोन चाकू व वाघ नखे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक भापकर, सागर बर्गे व पोलीस पथकाने ही कारवाई केली.