Mon, May 20, 2019 20:09होमपेज › Satara › आय्यो ‘शहर’ला एकवीसच ‘आय.ओ.’

आय्यो ‘शहर’ला एकवीसच ‘आय.ओ.’

Published On: Apr 08 2018 2:19AM | Last Updated: Apr 07 2018 10:58PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

सातारा शहर पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या दीडशे पोलिसांपैकी अवघे एकवीसच पोलिस तपासी अधिकारी असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस गुन्हे निर्गती ऐवजी पेंडन्सी वाढतच असून शहर पोलिस ठाण्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात हेच विदारक वास्तव आहे. दरम्यान, गुन्ह्यांचा निपटारा होत नसल्याने ‘आय्यो शहर पोलिस ठाण्यामध्ये एकवीसच तपासी अधिकारी’ अशी म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्याचे अडीच वर्षांपूर्वी विभाजन होवून शाहूपुरी पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. सातारा शहराची गुन्हे दाखल होणार्‍या संख्यांची तुलना केल्यास शहर पोलिस ठाण्यात दर महिन्याला सरासरी 75 ते 80 गुन्हे दाखल होत आहेत तर शाहूपुरी पोलिस ठाण्यात दर महिन्याला 40 ते 50 गुन्हे दाखल होत आहेत. एकट्या सातारा शहरात दर महिन्याला सरासरी 110 ते 125 गुन्हे दाखल होत आहेत. एकीकडे गुन्हे दाखल होण्याची संख्या वाढतच असताना दुसरीकडे मात्र पोलिसांची संख्या  वाढलेली नाही.

या सर्व प्रकारामुळे सातार्‍यातील दाखल होणार्‍या गुन्ह्यांची उकल, त्याचा पुढील तपास व तो न्यायालयात किती टिकतो हा सर्वच संशोधनाचा विषय होवून बसला आहे. गुन्हे दाखल होण्याच्या तुलनेत त्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस यंत्रणाच उणीपुरी असल्याने बहुतेक गुन्ह्यांच्या तपासाचा बोजवारा उडत आहे. यासाठी सातारा शहर पोलिस ठाण्याची माहिती घेतली असता त्यातून धक्‍कादायक बाबी समोर आल्या.

सध्या सातारा शहर पोलिस ठाण्यात 1 पोलिस निरीक्षक, 9 सपोनि, फौजदार, 34 पोलिस हवालदार, 15 सहाय्यक फौजदार, 90 पोलिस कर्मचारी अशाप्रकारे 149 पोलिस तैनात आहेत. वास्तविक शहर पोलिस ठाण्याला दोन पोलिस निरीक्षकांची गरज असताना गेल्या दोन वर्षांपासून एकच पोलिस निरीक्षक याठिकाणी कार्यरत आहेत. रिक्‍त असणार्‍या अधिकार्‍यांच्या या ठिकाणापासून सुरु झालेला प्रवास पुढे असाच कायम आहे. सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लाखो नागरिकांसाठी अवघे दीडशे पोलिस अधिकारी, कर्मचारी कायदा व सुव्यवस्था संभाळण्यासाठी आहेत.

पोलिस दलामध्ये पोलिस स्टेशन स्तरावर तपासासाठी वर्गवारी असून पोलिस हवालदार, सपोनि, फौजदार, पोलिस निरीक्षक यांनाच तपासाचे अधिकार आहेत. जे पोलिस कान्स्टेबल व पोलिस नाईक आहेत त्यांना एखादा गुन्हा तपासाचे अधिकार नसतात.

शहर पोलिस ठाण्यामध्ये पोलिस हवालदार, सपोनि, फौजदार या तपासी अधिकार्‍यांची संख्या कागदोपत्री 58 असली तरी इतर कामांच्या व्यापामुळे यातील केवळ 21 पोलिसांकडेच गुन्हा तपासणीचे काम असल्याचे वास्तव आहे. यामुळे महिन्याला 70 ते 80 गुन्हे दाखल होत असताना हे सर्व गुन्हे या 21 पोलिसांना तपासावे लागत आहेत. एका गुन्ह्याचा तपास करुन त्याचे कोर्टात चार्जशीट पाठवायचे झाल्यास किमान चारशे ते पाचशे पानांचा गठ्ठा होतो. अशी अव्याहत प्रक्रिया दर महिन्याला अखंडीतपणे सुरु आहे. या सर्व प्रकारामुळे गुन्हे निर्गती होण्याऐवजी त्याची पेंडन्सी वाढत आहे. सध्या एका एका पोलिसाकडे किमान दहा गुन्हे पेंडिग आहेत. 

यासाठी प्रामुख्याने पोलिसांची संख्या वाढवणे. ज्या ठिकाणी अधिक पोलिस कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत त्याठिकाणी आवश्यक तेवढ्याच पोलिसांची नियुक्‍ती करणे, तसेच तपासी अधिकारी सपोनि, फौजदार यांच्याप्रमाणेच पोलिस हवालदार यांनाही सहाय्यक देणे गरजेचे बनले आहे.

Tags : satara, satara news, Twenty-one, investigating officer, city police station,