Thu, Jul 18, 2019 12:25होमपेज › Satara › वाळूचा ट्रॅक्टर कोतवालाच्या अंगावर घालण्याचा वाठार येथे प्रयत्न

वाळूचा ट्रॅक्टर कोतवालाच्या अंगावर घालण्याचा वाठार येथे प्रयत्न

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:58PMकराड :  प्रतिनिधी

वाळू चोरी रोखणासाठी नदीपात्रात उतरलेल्या गावकामगार कोतवालाच्या अंगावर टॅ्रक्टर घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत दक्षिण मांड नदीपात्रात ही घटना घडली असून संबंधितावर कराड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी विजय रंगराव तडाखे (रा. वाठार, ता. कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, विजय तडाखे हे वाठार येथे कोतवाल म्हणून नोकरी करतात. 15 एप्रिल रोजी सायंकाळी तलाठी सचिन वसंत निकम यांनी फोन करून तडाखे यांना दक्षिण मांड नदीपात्रात वाळू चोरीचा प्रकार सुरू असल्याचे सांगितले. रात्रीची वेळ असल्याने तडाखे यांनी पुतण्या स्वप्नील शंकर तडाखे याला बरोबर घेऊन दोघेजण दुचाकीवरून वाळू चोरीची खात्री करण्यासाठी गेले. नदीपात्राजवळ गेल्यानंतर त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिल्यावर दोघेजण ट्रॉलीत वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. तेथे संशयित हुसेन बादशाह नबीरस्सुल शेख उभा होता. तडाखे यांनी वाळू चोरी रोखत संशयितास ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयात जायचे असल्याचे सांगितले. त्यावर शेख याने ट्रॅक्टर सुरू करून पळून जात असताना तडाखे यांनी दुचाकीवरून त्याचा पाठलाग केले. 

काही अंतरावर गेल्यानंतर ट्रॅक्टरच्या पुढे दुचाकी घेऊन ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयिताने टॅक्टर तडाखे यांच्या दुचाकीवर घालण्याचा प्रयत्न करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या प्रकाराने तडाखे भांबावले. 

त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी रस्त्यातून बाजूला घेतल्याने ते बचावले. त्यानंतर संशयिताने वाठार ते कालवडे रोडकडेला वाळू खाली करून ट्रॅक्टर घेऊन तेथून पलायन केले. हा प्रकार तडाखे यांनी तलाठी सचिन निकम यांना कळवला. घटनेची माहिती मिळताच निवासी नायब तहसीलदार कुर्‍हाडे यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी तेथे दाखल झाले. 16 एप्रिल रोजी मंडलाअधिकारी नागेश निकम, गावकामगार तलाठी सचिन निकम यांनी पंचनामा केला. या प्रकाराची माहिती तहसीलदारांना दिल्यानंतर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.