Tue, May 21, 2019 04:59होमपेज › Satara › मुलाच्या डोळ्यादेखत आईचा अपघातात मृत्यू

मुलाच्या डोळ्यादेखत आईचा अपघातात मृत्यू

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 11:09PMशिवथर : वार्ताहर

वटपौर्णिमा साजरी करून मुलासमवेत सातारला येत असलेल्या महिलेला अपघातात जीव गमवावा लागला. वाढेफाटा येथे ट्रक व दुचाकीची ही दुर्घटना घडली. मुलाच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने हळहळ व्यक्‍त होत आहे.

सौ. छाया शिवाजी कदम (वय 60, सध्या रा. संगमनगर, सातारा, मूळ रा. अनपटवाडी, ता. कोरेगाव) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सौ. छाया कदम यांचे मूळ गाव अनपटवाडी असून सध्या कुटुंबियासोबत त्या सातारामध्ये राहत होत्या. बुधवारी वटपौर्णिमेचा सण व शेतातील कामे असल्याने त्या गावी गेल्या होत्या. वटपौर्णिमा साजरी केल्यानंतर त्या मुलगा सुरज बरोबर दुचाकीवरुन (एमएच 11 सीए 3960) वाडीहून साताराकडे येत होत्या.

दुचाकी वाढे फाटा येथे सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर त्याचवेळी लोणंदकडे निघालेला ट्रक (एम एच 11 एम 3951) यांची समोरासमोर धडक झाली. ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने सौ. छाया जागीच ठार झाल्या.  सूरजच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू झाला. त्यामुळे सूरज हडबडून गेला. 

अपघातामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करुन मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत सौ. छाया यांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.