Fri, Jun 05, 2020 23:36होमपेज › Satara › रस्ता जोडल्यास पर्यटनाचा खजाना द‍ृष्टीक्षेपात

रस्ता जोडल्यास पर्यटनाचा खजाना द‍ृष्टीक्षेपात

Published On: Nov 01 2018 1:05AM | Last Updated: Oct 31 2018 8:30PMपरळी : सोमनाथ राऊत

कोणत्याही परिसराचा विकास साधायचा असेल दळणवळणाची सुविधा भक्‍कम करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्या पर्यटनस्थळाचा विकास साधता येतो. परंतु, उलटा प्रवास सुरू झाल्याने वेळ व पैसा वाया जात आहे. त्यामुळे  सातारा, जावली, महाबळेश्‍वर व पाटण तालुक्यातील गावे डोंगरमाथ्यावरील रस्त्यानेच जोडली तर पर्यटन, स्थानिकांना रोजगार, मुंबईला जाणार्‍या चाकरमान्यांचा हा लोंढा थांबणार आहे.  

कास पठार, चाळकेवाडी, कुसवड्याचे पठार अन् पवनचक्क्या यासह कित्येक गोष्टी चार तालुक्यांमध्ये विखुरल्या गेल्या आहेत.  मात्र या ठिकाणी जाताना उलटा सुलटा प्रवास करावा लागत असल्याने पर्यटकांची धोबीपछाड होत आहे.  

सद्यस्थितीत कास पुष्प पठारावरून भांबवली, बामणोली पर्यंत रस्ते आहेत. तिथून केळवली सांडवलीला अथवा आलवडीला जाता येत नाही. त्यामुळे उलटे साता़र्‍यात यावे लागते. कास पठार-भांबवली- झुंगटी- जळकेवाडी-केळवली-नित्रळ- परळी हा रस्ता आहे. परंतु, या रस्त्यावर प्रचंड अडचणी असून रस्त्याची झालेली चाळण व वन विभागांच्या अडचणींमुळे नागरिकांची सोय होत नाही. हा रस्ता केल्यास सातारा-कास -बामणोली परत भांबवली- केळवली मार्गे सातारा किंवा सज्जनगड जाता येईल.  त्याचबरोबर झुंगटी ते धावली हा रस्ता सद्यस्थितीला सुरू आहे. हा रस्ता आलवडी पर्यंत जोडल्यास आलवडी पाटेघर रोहोट मार्गे सातारा किंवा ठोसेघर-चाळकेवाडीला जायचे असेल तर कास पठारावरून आलेला झुंगटी धावली मार्गे आलेला रस्ता केळवली, दत्तवाडी, सांडवली (गणेशवाडी) मार्गे पांगारे ठोसेघरला जाता येईल. सज्जनगड चाळकेवाडी ते अगदी चाळकेवाडीच्या पुढे पाटण पर्यंत हा रस्ता तयार आहे.  

महाबळेश्वर तापोळा मार्गे आलेली वाहने कास पठार, भांबवली वजराई धबधबा केळवली सांडवली धबधबा, भात शेती, मोरबाग गुहा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा चाळकेवाडी पावनचक्क्या पाहून पाटण मार्गे जावू शकतात. ही अशी वाहतूक झाल्याने स्थानिकांना बाजापेठ उपलब्ध होईल. त्यांच्या कच्या मालाला बाजारपेठ मिळेल, पर्यटन, रोजगार वाढेल, कास मार्गावरील वाहतूकीचा ताण कमी होणार आहे.  या परिसरातली विलोभनिय कोयना, उरमोडी तारळीचे बॅक वॉटर, तांबीच्या पठारावरून दिसणारा वासोटा किल्ला विविध वन औषधी वनस्पती यांचे सहज दर्शन होणार आहे. हा सर्व नजारा एकत्रित करण्यासाठी काही ठिकाणी वनखात्याची परवानगी तर केळवली सांडवली हा रस्ता जोडणे व धावली आलवडी हा रस्ता जोडणे ही महत्त्वाची कामे पूणे करणे शिल्लक आहेत. ही कामे पुर्ण झाल्यास या वाडी वस्त्यांवरील गावे संपर्कात येतील.