Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Satara › ब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळली

ब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळली

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 26 2017 1:34AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील किल्ले अजिंक्यतारा पाहण्यासाठी आलेली मुंबईच्या पर्यटकांची ट्रॅव्हल्स ब्रेक फेल झाल्याने किल्ल्यावरून सुमारे 20 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. काळजाचा थरकाप उडवणार्‍या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, 47 प्रवाशांपैकी 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, सर्व पर्यटक मुंबई, कळंबोली, वसई येथील असून, हा अपघात दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास झाला.

रेश्मा प्रकाश घरत, अनंत भास्कर किणी, कुमुद रामचंद्र घरत, कुमुदिनी जगदिश किणी, दिलीप लक्ष्मण घरत, विजया हिराजी किणी, वर्षा दिलीप घरत, उर्मिला मनोहर घरत, हिराजी भास्कर किणी, सायली मनोज किणी, अनंत गणपत निजाई, भारती रमाकांत किणी, मोहिनी जयंत म्हेत्रे, ज्योती अनंत किणी, मंदा विलास पाटील, सुनंदा सुधीर घरत (सर्व रा.कळंब, वसई), स्वाती अशोक तांडेल (रा. चर्च गेट) व चालक गणेश संतोष बोडके (रा. विरार पालघर) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, विरार, कळंबोली येथील 47 जण सातारा जिल्ह्यामध्ये देवदर्शन व पर्यटनासाठी ट्रॅव्हल्समधून (एमएच 4 एफके 1677) आले होते. सोमवारी पुसेगाव, सज्जनगड येथून आल्यानंतर दुपारी अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी ते गेले होते. किल्ला पाहून साताराकडे येत असताना ट्रॅव्हल्सचा उताराला ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालक गडबडून गेला व ट्रॅव्हल्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केला. तीव्र स्वरुपाचा उतार असल्याने ट्रॅव्हल्सला हेेलकावे बसू लागले. रस्त्यामधून समोरुन येणारी वाहने व पादचारी चुकवण्यासाठी चालकाने कमालीचा प्रयत्न केला. सुमारे अर्ध्या किलोमीटर अंतरानंतर चालकाने ट्रॅव्हल्स कठड्यावर घालून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातच ट्रॅव्हल्स दरीच्या दिशेने कोसळली. सुदैवाने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने ट्रॅव्हल्स 20 फूट खोली खाली गेल्यानंतर झाडावर जावून अडकली.

ट्रॅव्हल्स दरीत कोसळताना ही घटना पाहणार्‍या परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. प्रत्यक्ष घटना पाहणार्‍यांनी तत्काळ याबाबतची माहिती शहर पोलिसांना दिली. अजिंक्यतारावरुन ट्रॅव्हल्स कोसळल्याचे वृत्त सातार्‍यात पसरल्यानंतर मदतीसाठी अनेक संघटनांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, दरीत ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी अडकून पडल्याने मदतीसाठी त्यांनी टाहो फोडला होता. सातार्‍यातील युवकांनी दरीत जावून तात्काळ प्रवाशांना बाहेर काढत बचाव कार्याला सुरुवात केली. एकएक प्रवासी बाहेर काढल्यानंतर जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी रुग्णवाहिका, दोरखंड इत्यादी साहित्य आणून बचाव कार्याला गती दिली. सुमारे 1 तासानंतर सर्व प्रवासी दरीतून बाहेर काढण्यात यश आले. अपघातात जखमींना पायाला, डोक्याला, हाताला किरकोळ दुखापत झालेली आहे. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

माझगाव डॉकचे कर्मचारी कुटुंब

उलटलेल्या ट्रॅव्हल्समधील सर्व पर्यटक हे माझगाव डॉकचे कर्मचारी आहेत. जखमी सर्व एकमेकांचे ओळखीचे आहेत. सुमारे 15 हून अधिक कुटुंब यामध्ये असून, दरवर्षी ते फिरण्यासाठी जातात. यंदा त्यांनी फिरण्यासाठी सातारा जिल्हा निवडला होता. गेल्या दोन दिवसांपासून मांढरदेव, पुसेगाव, सज्जनगड, सातारा व उद्या महाबळेश्‍वर येथे जाणार होते. किल्ले अजिंक्यतारा पाहून झाल्यानंतर सातार्‍यात फिरून ते येथेच मुक्कामी थांबणार होते.